मुंबई : आजकाल डायटिंगचे फॅड आहे. असे जरी असेल तरी बाहेरच्या खाण्याकडे तरुणाईचा कल वाढलेला दिसतो. यामुळेच खूप साऱ्या मुलींनी पीसीओडीच्या त्रासाला समोरे जावे लागते. पूर्वीच्या काळात किशोरवयीन मुलींना बदाम, तूप, लोणी, मलाई असे पदार्थ आहारात दिले जायचे. त्यामुळे त्यांची मासिक पाळी नियमित राहत होती आणि अशक्तपणा जाणवत नसे. पण काळानुसार जीवनशैली बदलली. या बदललेल्या जीवनशैलीचा दुष्परिणाम म्हणजे 'पीसीओडी' म्हणजेच पॉलीसिस्टिक ओवेरियन डिजीज.
हे एक प्रकारचे हार्मोनल डिसऑर्डर आहे. जे आजकालच्या मुलींमध्ये सामान्यपणे आढळते. यामध्ये आपल्या ओव्हरीमध्ये एका अंड्याच्या जागी खूप सारे छोटे-छोटे अंडे तयार होऊ लागतात. पण त्यातील एकही योग्य नसते. यामुळे महिलांची मासिक पाळीचे चक्रही बिघडते.
आजकालच्या मुली सडपातळ दिसण्यासाठी कमी खातात किंवा डायटिंग करतात. पण त्यामुळे शरीराला योग्य ते पोषण मिळत नाही आणि त्यामुळे अशक्तपणा जाणवतो.इतकंच नाही तर जंक फूड, बाहेरचे अन्नपदार्थ यांच्या सेवनाने अनेक महिलांना या समस्येला सामोरे जावे लागते.
१. आहारात फळे व भाज्यांचा समावेश करा. डेअरी प्रॉडक्स घेणे शक्यतो टाळा.
२. सॅच्युरेटेड आणि हायड्रोजनेटेड फॅट्सचे सेवन टाळा.
३. पीसीओडी असणाऱ्या महिलांसाठी हेल्दी नाश्ता अत्यंत आवश्यक आहे. यात दूध, अंड, फळे, बदाम, ज्यूस आणि मल्टीग्रेन ब्रेड याचा समावेश करा. चपाती, हिरव्या पालेभाज्या, दही अवश्य खा.
४. चालणे, सायकलिंग, एरोबिक्स, योगसाधना किंवा लाईट व्यायाम करा.
५. नेहमी हायड्रेट रहा. दिवसातून ३-४ लीटर पाणी प्या.
६. साखर, गुळ, मैदा या पदार्थांचे सेवन करणे टाळा.