मुंबई : लसीकरणाबाबत लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतानाच नाशिकच्या सिडकोमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला चुंबकत्व निर्माण झाल्याचं प्रकार समोर आला आहे. कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतल्यानंतर 71 वर्षीय अरविंद सोनार यांच्या शरीराला चमचे तसंच नाणी अशा वस्तू चिकटायला लागल्या असल्याचं समोर आलं. या घटनेचा व्हीडियोही वायरल झाला आहे. मात्र या घटनेचा लसीकरणाशी संबंध जोडू नये असं महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलंय.
दरम्यान झी 24 ताससोबत बोलताना डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, "लसीकरणाचा या गोष्टीशी संबंध जोडणं संपूर्पणे चुकीचं आहे. शरीराला चुंबकत्व निर्माण होणं आणि लसीकरणाचा काहीही संबंध नाही. आपण कोटी लोकांचं लसीकरण केलं असल्याने हे त्याच्याशी संबंधित नाही."
डॉ. लहाने पुढे म्हणाले, "मुळात लोखंडाच्या वस्तू शरीराला चिटकतात याबाबत आपण यापूर्वी ऐकलं आहे. आणि अशा प्रकारच्या चर्चा होत असतात. मात्र यावर संशोधन केलं असता वैज्ञानिकदृष्ट्या याला पुरावा नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे जर कोणाला असं काही होत असेल तर त्यांनी डॉक्टरांची मदत घ्यावी. याचा लसीकरणाशी तीळमात्र संबंध नाही."
दरम्यान सोनार यांच्या अंगाला वस्तू चिकटत असल्याचं 'झी २४ तास'च्या कॅमेरासमोर दिसलं आहे. दोन दिवसांपूर्वी कोरोना लसीचा दुसरा डोस त्यांनी एका खासगी हॉस्पिटलमध्ये घेतला होता. त्यानंतर लस घेतल्यावर समाज माध्यमात चुंबकत्व निर्माण होतं असं समजल्यावर त्यांनी स्वतः प्रयत्न करून बघितला. तर त्यांना घरातील लोखंडाच्या आणि स्टीलच्या वस्तू, नाणे चमचे शरीरावर चिकटून राहात असल्याचे लक्षात आलं.