Fourth Mumbai Will Be Developed Here: नवी मुंबईजवळ तिसरी मुंबई उभारण्यात येणार असून यासंदर्भातील कामला सुरुवात झाल्याच्या बातम्या समोर येत असतानाच आता मुंबईला चौथा पर्याय म्हणून चौथ्या मुंबईचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसीने) राज्य सरकारकडे हा विशेष प्रस्ताव मांडला आहे. एमएसआरडीसीच्या प्रस्तावानुसार वाढवण बंदरानजीक चौथी मुंबई विकसित करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
एमएसआरडीसीने राज्य सरकारला दिलेल्या प्रस्तावानुसार, चौथी मुंबईत विकसित करण्यासाठी 107 गावांमधील 512 चौरस किमी क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. याला मान्यता मिळताच एमएसआरडीसीचा नवे शहर उभारण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या मेगा प्रोजेक्टमुळे 107 गावांचा कायापालट होणार आहे.
नीती आयोगाने मुंबई महानगरला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात आर्थिक विकास केंद्र (ग्रोथ हब) उभारली जाणार आहेत. त्यातच आता देशातील सर्वात मोठे बंदर वाढवण येथे उभारण्याचं काम सुरु झालं आहे. डहाणू तालुक्यात वाढवण आणि पालघर तालुक्यात केळवा येथे दोन विकास केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच एमएसआरडीसीची नियुक्ती केली होती. त्यानुसार डहाणू तालुक्यातील 11 आणि पालघर तालुक्यातील 3 गावांमध्ये ही विकास केंद्रे साकारली जाणार होती. यातील वाढवण विकास केंद्र हे 33.88 चौरस किमीवर तर केळवा केंद्र 48.22 चौरस किमी क्षेत्रावर उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
वाढवण बंदराच्या प्रभाव क्षेत्रातील तब्बल 107 गावांमधील 512 चौरस किमीच्या प्रदेशात चौथी मुंबई विकसित करण्यासाठी एमएसआरडीसीने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव जानेवारीमध्येच एसआरआरडीसीने राज्य सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावानुसार चौथ्या मुंबईची हद्द वाढवण बंदराच्या क्षेत्रापासून ते तलासरीपर्यंत विस्तारलेली असेल, अशी माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली आहे.
चौथ्या मुंबईत काय काय असणार आहे?
> वाढवण बंदरामार्गे आलेला माल साठवण्यासाठी लॉजिस्टीक पार्क या ठिकाणी असणार आहे.
> बंदरामुळे उद्योग विश्वातील अनेकांची या भागात ये-जा वाढेल. त्या पार्श्वभूमीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा प्रस्ताव आहे.
> मनोरंजनाच्या अनुषंगाने रिक्रिएशन ग्राउंड येथे तयार केली जातील. यात गोल्फ कोर्सचा समावेश करण्यात आला आहे.
> कन्व्हेंशन सेंटर्स उभारली जातील.
> वाढवण बंदर ते दिल्ली मुंबई डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉरदरम्यान मालाची जलद आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी रेल्वेचा डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर असणार आहे.
> नव्या शहरात हेलिपॅड, एअरस्ट्रीप उभारण्याचेही निजन आहे. त्यातून दळणवळण आणि माल वाहतूक अधिक जलद होऊ शकेल, असं सांगितलं जात आहे.