भारतीयांचं सोडा, ब्रिटनच्या राजकुमारलाही बाहेर काढणार अमेरिका! कोर्टाच्या आदेशाने खळबळ

Prince Harry Visa Case:  ब्रिटिश राजकुमार प्रिन्स हॅरी सुद्धा अमेरिकेत सुरक्षित नसल्याचे वृत्त समोर आले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Feb 8, 2025, 11:02 AM IST
भारतीयांचं सोडा, ब्रिटनच्या राजकुमारलाही बाहेर काढणार अमेरिका! कोर्टाच्या आदेशाने खळबळ title=
ब्रिटिश राजकुमार प्रिन्स हॅरी

Prince Harry Visa Case: डंकी रूटने किंवा बेकायदा अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना शेकडोंच्या संख्येने स्वगृही पाठवले जात आहे. सर्वत्र भारतीयांना डिपोर्ट केल्याची चर्चा सुरू असतानाच आता ब्रिटिश राजकुमार प्रिन्स हॅरी सुद्धा अमेरिकेत सुरक्षित नसल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना कुठल्याही क्षणी देश सोडण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.

कोण आहेत प्रिन्स हॅरी?

ब्रिटनच्या राजघराण्यातील थेट सदस्य आणि राजकुमार प्रिन्स हॅरी ब्रिटनचे सध्याचे राजा किंग चार्ल्स तिसरे आणि डायना यांचा दुसरा मुलगा आहे. ब्रिटनच्या सिंहासनासाठी वारसदारांच्या रांगेत प्रिन्स हॅरीचा पाचवा क्रमांक लागतो. ब्रिटिश रॉयल फॅमिलीमध्ये राजा किंवा राणी पद नसले तरीही एखाद्या प्रांताचे किंवा भूभागाचे स्वामित्व दिले जाते. त्यांना ड्यूक किंवा डचेस असे पद दिले जाते. त्यानुसार, प्रिन्स हॅरी ब्रिटनच्या ससेक्स येथील ड्यूक आहेत.

अमेरिकेत कधी गेले?

प्रिन्स हॅरी राजघराण्याबाहेरची असलेली एक अभिनेत्री मेघन मार्कल हिच्या प्रेमात पडले. त्यावेळी तत्कालीन महाराणी एलिझाबेथ (प्रिन्स यांच्या आजी) आणि कुटुंबाने त्यांचे संबंध स्वीकारले. २०१८ मध्ये दोघांचे थाटात लग्न समारंभ पार पडले.

लग्नाच्या काही दिवसांतच त्यांनी राजघराण्यातील सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त होण्याची घोषणा केली. २०२० च्या सुमारास त्यांनी स्वतः कमवून अमेरिकेतच राहण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांचा व्हिसा आणि राहण्याचा करार नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे गुप्त ठेवण्यात आले.

कोर्टाचा निकाल काय? आताच वाद का होतोय?

आतापर्यंतच्या अमेरिकेने प्रिन्स हॅरी सामान्य व्यक्ती नसल्याने त्यांची व्हिसा आणि इमिग्रेशनशी संबंधित कागदपत्रे गुप्त ठेवली होती. टेलिग्राफच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी अमेरिकेच्या एका न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सप्टेंबरमध्ये निकाल देताना न्यायाधीश कार्ल निकोलस यांनी, प्रिन्स हॅरी ड्यूक असल्याने त्यांची कागदपत्रे सार्वजनिक करता येणार नाही. त्यात सामान्य नागरिकांना काही रुची नाही असे म्हटले होते.

परंतु, याच प्रकरणी गेल्या आठवड्यात झालेल्या एका सुनावणीमध्ये बोलताना त्याच न्यायाधीशांनी, आता सरकार बदललंय आणि इमिग्रेशनचे कायदे सुद्धा बदलले असे स्पष्ट केले. प्रिन्स हॅरी यांची अतिशय खासगी माहिती सार्वजनिक न करता त्यांचे इमिग्रेशन आणि व्हिसा संबंधित कागदपत्रे जास्तीत जास्त सार्वजनिक करण्याचा प्रयत्न करू असे त्याच न्यायाधीशांनी म्हटले आहे.

जुने ड्रग्स प्रकरण बाहेर काढणार ट्रम्प

प्रिन्स हॅरी यांनी जानेवारी २०२३ मध्ये अमेरिकेत ड्रग्सचे सेवन केल्याची कबुली दिली होती. यावरून मोठा गदारोळ उडाला होता. अमेरिकन व्हिसा देताना कुणी ड्रग्स घेत असेल तर त्याचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळेच प्रिन्स हॅरी यांची कागदपत्रे सार्वजनिक करण्याच्या मागणीने जोर धरला होता. आता नव्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ट्रम्प यांनी हेच ड्रग्स प्रकरण पुन्हा बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, भारतासह इतर देशांच्या नागरिकांना जसे अमेरिकेतून बाहेर केले जात आहे तशाच पद्धतीने प्रिन्स हॅरी यांनाही बाहेर काढले जाणार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.