मुंबई : अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, अक्रोड खाल्ल्याने नैराश्याचा धोका कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. दररोज अक्रोड खाल्ल्याने एकाग्रताही वाढत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. कॅलिफोर्निया विद्यापिठाच्या संशोधकांनी अक्रोड खाणाऱ्या लोकांमध्ये नैराश्याचे प्रमाण २६ टक्क्यांनी कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. हे संशोधन न्यूट्रेंट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. अक्रोड खाल्याने शरीरातील उर्जा वाढवण्यास तसेच मन एकाग्र होण्यासही मदत होत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. विद्यापिठाचे प्रमुख संशोधक लेनोर अरब यांनी केलेल्या अभ्यासात सामिल करण्यात आलेल्या सहा तरूणांपैकी प्रत्येक तरूण आयुष्यात एकदा तरी नैराश्येचा शिकार झाल्याचे सांगितले. अक्रोडच्या सेवनाने मानसिक तणाव कमी होतो तसेच बुद्धी तल्लख होण्यासह मदत होते.
अक्रोडचे सेवन केल्याने कॅन्सर, हृदयरोग आणि इतर काही आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते. अक्रोड खाल्याने कोलेस्ट्रोल कमी होते आणि हृदयासंबंधी आजारांपासून बचाव होतो. अक्रोड खाल्ल्याने कॅलरी संबंधीत समस्या कमी करण्यास देखील मदत होते. पुरूषांमधील शु्क्राणूंची संख्या जगभरात मोठी समस्या मानली जात आहे. संशोधकांनी यावर दररोज अक्रोड खाणे फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.
अक्रोड अॅन्टीऑक्सिडन्ट आहे. अक्रोड एकमेव असा मेवा आहे, जो ओमेगा-३ फॅटी ऍसिड, अल्फा-लिनोलेनिक ऍसिडचा जबरदस्त स्त्रोत आहे. ओमेगा-३ फॅटी ऍसिड मेंदूतील अॅक्टिव्हिटी वाढवण्यास मदत करते. अक्रोडमधील अॅन्टीऑक्सिडन्ट आणि प्रोटीन शरीरासाठी गुणकारी ठरतात. अक्रोडमध्ये कॅलरीज्, कार्बोहायड्रेट्स असतात जे वजन वाढवण्यासाठी मदत करतात. हाडं आणि दात मजबूत करण्यासाठीही अक्रोडचे सेवन फायदेशीर ठरते. अक्रोडमुळे मधुमेहाचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो. अक्रोडमधील गुणधर्म रक्तप्रवाह सुरळित ठेवतात. दररोज अक्रोड खाल्ल्याने त्वचा चमकदार, तजेलदार होण्यास मदत होते.