Hepatitis A Outbreak In Kerala: 'हेपेटायटीस' हा माणसाच्या यकृतावर परिणाम करणारा आजार आहे. अनेक प्रकारच्या विषाणूंमुळे या आजाराचा संसर्ग होऊ शकते, ज्यामध्ये 'हिपॅटायटीस ए, बी, सी, डी आणि ई' असे प्रकार आहेत. केरळमध्ये 'हेपेटायटीस ए' च्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चार महिन्यांत केरळात 'हेपेटायटीस ए' मुळे 12 मृत्यू आणि संसर्गाची 1977 प्रकरणं समोर आली आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी कोझिकोड, मलप्पुरम, त्रिशूर आणि एर्नाकुलम या चार जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे, या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या नोंदवली गेली आहे.
हेपेटायटीस ए म्हणजे काय?
'हेपेटायटीस ए' हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो माणसाच्या यकृतावर परिणाम करतो. यामुळे यकृताची जळजळ होते, यात सौम्य ते गंभीर आजाराची शक्यता बळावते. हा संसर्ग दोन महिने टिकू शकतो. पण 'हिपॅटायटीस ए' मुळे यकृताचं कायमचं नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. जगभरात 'हिपॅटायटीस ए' खूप सामान्य आजार आहे. विशेषत: ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे. अन्न आणि पाणी दूषित आहे. हा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये अगदी सहज पसरतो, यामुळे या आजाराची प्रकरणं वेगाने वाढतात.
हेपेटायटीसची लक्षणं
'हिपॅटायटीस'ची लक्षणे प्रत्येकामध्ये सारखी नसतात. काहीवेळा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. याची लक्षणं सामान्य आजाराप्रमाणेच आहेत. म्हणजे थकवा, अशक्तपणा, भूक कमी लागणे, पोटाच्या वरच्या भागात दुखणं, मळमळ आणि उल्टी, ताप, त्वचेवर खाज अशी लक्षणं आढळतात.
पुरेसा आराम आणि काळजी घेणं आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं हा 'हेपेटायटीस'वरचा योग्य उपचार आहे. तुमचा ताप आणि कावीळ कमी होईपर्यंत आराम करा, तुमच्या यकृतावर परिणाम होतील असे पदार्थ खाणं टाळा, डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्या असाल सल्ला तज्ज्ञ देतात.
कोणाला हेपेटायटीसचा जास्त धोका
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या आणि एचआयव्ही रुग्णांमध्ये हिपॅटायटीस ए चा धोका जास्त असतो.