How To Eat Flax Seeds: आळशीच्या बिया म्हणजेच जवसची मागणी सध्या वाढत आहे. स्मूदी असेल किंवा रोजचे जेवण यामध्ये जवसाच्या बियांचा वापर केला जातो. अनेक पोषण मूल्यांनी परिपूर्ण असलेल्या जवसाच्या बियांचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. महिलांसाठी तर जवस अमृतासमान आहेत. हार्मोन्स असंतुलित असणे, लठ्ठपणा, केसांच्या समस्या यांवर आळशीच्या बिया रामबाण उपाय आहे. पण आळशीच्या बियांचे सेवन कसे करायचे याबाबत अनेकांना माहिती नसते. त्यामुळं आज आपण आळशीच्या बियांचे सेवन कसे करावे हे जाणून घेऊया.
आळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, फायबर आणि अॅंटिऑक्सिडेंट आढळतात. तज्ज्ञांच्या मते हे सर्व गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ओमेगा 3 हे मेंदूचे आरोग्य व त्वचेची निगा राखते. तसंच, शरीरातील जळजळ कमी करते. फायबर पचनासाठी आवश्यक आहे. आळशीच्या बियांमध्ये आढळणाऱ्या इतर पोषक घटकांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांचा समावेश आहे.
आळशीच्या बियांचे सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. स्मूदी, ब्रेड, बेक केलेल्या पदार्थ किंवा ड्रायफ्रुट्ससह तुम्ही अन्य पदार्थात मिसळूनही तुम्ही खावू शकता. आळशीच्या बिया कोरड्या खाल्ल्यास त्या पचण्यास कठिण जावू शकतात. त्यामुळं सूज येणे व पचनास त्रास होऊ शकतो. त्यामुळं बियांचे सेवन करण्यापूर्वी 10 मिनिटे कोमट पाण्यात भिजवा किंवा दोन तास साध्या पाण्यात भिजवत ठेवा. नंतर त्याचे सेवन करावे.
आळशीच्या बियांच्या पावडरचे सेवनदेखील तुम्ही करु शकता. आळशीच्या बिया तव्यावर थोड्या भाजून घेतल्यानंतर त्याची बारीक पावडर करुन ती स्मुदी, शेक किंवा पीठात टाकून त्याच्या चपात्या करु शकता. आळशीच्या बियांची पावडर पचायलादेखील हलकी असते.
आळशीच्या बियांचे नैसर्गिक तेलदेखील आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण हे तेल जेवणासाठी वापरणे योग्य नाही. जवसाच्या तेलाचा वापर तुम्ही केसांसाठी करु शकता. यातील गुणधर्मामुळं जवसाचे तेल केस गळतीवर प्रभावी उपाय ठरते. तसंच, त्वचेसाठीही जवसाचे तेल तुम्ही वापरू शकता.
आळशीच्या बियांचे सेवन एकाचवेळी अतिप्रमाणात करु नका. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच, बद्धकोष्ठताचा त्रासही जाणवू शकतो. त्यामुळं एक चमचा आळशीच्ये सेवन करणे हे योग्य आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)