Covid 19 Vaccine : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना कोविड-19 लसीचा बूस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे. 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती ज्यांना दुसरा डोस घेऊन नऊ महिने झाले आहेत अशी सर्व लोकं बूस्टर डोससाठी पात्र असतील. दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून लसीची किंमती कमी करण्यासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute of India) सीईओ आदर पूनावाला यांनी ट्विट केलं आहे 'आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर, SII ने खाजगी रुग्णालयांसाठी COVISHIELD लसीची किंमत 600 रुपयांवरून 225 रुपये प्रति डोस कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व 18+ वयोगटांसाठी बूस्टर डोस देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं स्वागत करतो' असं पूनावाला यांनी आपल्याट्विटमध्ये म्हटलं आहे.
भारत बायोटेकनेही (Bharat Biotech) लसीच्या किंमती कमी केल्या आहेत. भारत हायोटेकच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एला यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. 'आम्ही खाजगी रुग्णालयांसाठी covaxin लसीची किंमत 1200 रुपयांवरून 225 रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या, देशात कोणत्याही व्यक्तीला कोविड लसीचे वेगवेगळे डोस देण्याची परवानगी नाही, याचा अर्थ पहिला आणि दुसरा डोस ज्या कंपनीचा घेतला आहे त्याच कंपनीचा बूस्टर डोस घ्यावा लागणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. 'कोरोनाविरुद्धची लढाई आता अधिक मजबूत होईल. 18 वर्षांवरील नागरिकांना खाजगी केंद्रांमध्ये 10 एप्रिलपासून बूस्टर डोस मिळू शकतील. ज्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने झाले आहेत ते सर्व पात्र असतील.