मुंबई : थ्रॉम्बोसिस या आजाराला रक्तात गुठळी (थ्रॉम्बस) तयार होण्याचा आजार असे म्हटले जाते. या अवस्थेचे निदान सामान्यपणे होत नाही आणि त्यावर उपचारही होत नाहीत. त्याचे परिणाम मात्र अत्यंत गंभीर असतात. शरीराच्या विविध भागांवर परिणाम करणारे सुमारे पंधरा प्रकारचे थ्रॉम्बोसिस आहेत. यातील डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) हा सर्वांत लक्षणविरहित (असिम्प्टोमॅटिक) प्रकारचा आहे. डीव्हीटी एवढ्या समस्या का निर्माण करतो हे समजून घेण्यासाठी आधी खोल शिरा (डीप व्हेन्स) म्हणजे नक्की काय हे समजून घेतले पाहिजे. खोल शिरा या अन्य शिरांच्या तुलनेत त्वचेपासून ब-याच खोल असतात. त्यामुळे या डीप व्हेन्सपैकी एखादीमध्ये गुठळी तयार झाल्यास ती संपूर्ण अभिसरण प्रणालीतून जाण्याची व शरीराच्या दुस-या एखाद्या भागात पक्की होऊन बसण्याची शक्यता दाट असते. (याला थ्रोम्बोएम्बोलिझमही म्हणतात).
गुठळी तयार होण्यासाठी तीन प्रमुख घटक कारणीभूत ठरतात: नियंत्रित किंवा मर्यादित हालचाल; विशिष्ट शस्त्रक्रियांमुळे किंवा रक्तवाहिन्यांमधील दाबामुळे हानीग्रस्त झालेल्या रक्तवाहिन्या; आणि रक्तप्रवाहाच्या नमुन्यामधील व्यत्यय या तीन कारणांमुळे धमन्या किंवा शि-यांमध्ये रक्त साकळून राहते.
लॉकडाउनमुळे देशभरातील लोकांच्या हालचालींवर निर्बंध आले आहेत. यामुळे डीव्हीटी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, कोरोनाविषाणूची लागण होण्याच्या भीतीमुळे लोक उपचार घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याचप्रमाणे कोविडमुळे आरोग्यसेवेवर आलेल्या ताणामुळे बिगर-कोविड उपचारांची व्यवस्था कोलमडली आहे.
मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधील व्हस्क्युलर आणि एण्डोव्हस्क्युलर सर्व्हिसेस विभागाचे कन्सल्टण्ट डॉ. आर. सेखर (एमएस, एफआरसीएसईडी, एफआरसीएसग्लास्ग, एफव्हीएसआय) उपचार घेण्याबद्दलच्या अनिच्छेबाबत सांगतात, “रुग्णालयांमध्ये सध्या केवळ कोविड-१९च्या रुग्णांवरच उपचार केले जात आहेत असे एकतर लोकांना वाटत आहे किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी रुग्णालयात गेल्यास कोविडची लागण होऊ शकेल अशी भीती त्यांना वाटत आहे. डीव्हीटीचे निदान वेळेत झाले नाही तर तो कोविडहून प्राणघातक आहे हे त्यांना कळत नाही. मुळात थ्रोम्बोसिस हे प्रादुर्भावाचे लक्षणही असू शकतो हे बहुतेकांना कळतच नाही आहे. ”
डॉ. सेखर यांच्या मते कोविडची साथ कितीही निराशाजनक आणि धोकादायक असली, तरी ही लागण होऊ नये म्हणून डीव्हीटीसारख्या संभाव्य प्राणघातक आजारांसाठी वैद्यकीय मदत घेणे टाळले जाणे योग्य नाही. ते पुढे म्हणाले, “थ्रोम्बोटिक प्रकारांचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णालयांमध्ये नियमांचे पालन केले जाते हे समजून घेणे चातुर्याचे व शहाणपणाचे आहे. व्हस्क्युलर आजारांचे वेळेत निदान न होणे हे कोविड संसर्गाच्या परिणामांहून अधिक घातक आहे हे रुग्णांनी लक्षात घ्यावे. कोरोनाविषाणूची लागण झालेल्या रुग्णांपैकी बहुतेक जण यातून बरे होत आहेत पण वाहिन्यांतील थ्रोम्बोटिक इव्हेण्ट्सचे निदान लांबणीवर पडल्यास त्याची परिणती एखादा अवयव किंवा प्राण गमावण्यात होऊ शकते.”
रुग्णांनी भरपूर पाणी पित राहावे.
मद्यपान टाळावे, कारण, त्यामुळे डिहायड्रेशन होते.
दररोज व्यायाम करणे अत्यावश्यक आहे, कारण, त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थेचा कार्य सुरळीत राहते. यामुळे रक्त साकळणे टाळले जाते व पर्यायाने गुठळ्या तयार होणेही टाळले जाते.
डीव्हीटी निदान झालेल्या किंवा तसा धोका असलेल्या रुग्णांनी दररोज घरीच व्यायाम करण्याची सवय बिंबवून घ्यावी.
Case study
रुग्णांमध्ये पुरेशी जागरूकता असेल, तर प्रगत औषधांच्या जोरावर आता थ्रोम्बोसिसचे व्यवस्थापन प्रभावीरित्या केले जाऊ शकते. पाय किंवा घोट्यावर सूज असेल आणि त्यासोबत सौम्य ताप, श्वास लागणे असा त्रास होत असेल तर संबंधित व्यक्तीने तातडीने वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. स्वत:च निदान करणे किंवा स्वत:च्या मनाने औषधे घेणे टाळलेच पाहिजे. विशेषत: साथीच्या काळात तर हे अजिबात टाळले पाहिजे. शिवाय, जीवनशैलीत सकारात्मक बदल आणि अँटिकोग्युलंट्सच्या प्रतिबंधात्मक उपचारांमुळे रुग्णाच्या आयुष्यात लक्षणीय फरक पडू शकतो.