Gastrointestinal infections: हिवाळ्यात आरोग्यासंबंधी बरेचसे आजार उद्भवण्याची शक्यता असते. अशातच, आता या ऋतूत शरीरातील गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (जीआय) भागातील समस्यांचा धोका वाढत आहे. हिवाळ्यात या आजाराने ग्रासलेल्या लोकांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खरंतर, हिवाळ्यात शरीराची प्रतिकारकशक्ती कमकुवत होते आणि त्यामुळेच व्हायरस आणि बॅक्टेरियांच्या प्रसारामुळे समस्या उद्भवू शकतात. या सगळ्याचा शरीरातील पचनसंस्थेवर वाईट परिणाम पाहायला मिळतात.
हिवाळ्यात बॅक्टेरियांमुळे गॅस्ट्रोइंटेराइटिसची समस्या डोके वर काढत आहे. या आजाराला पोटाचा फ्लू सुद्धा म्हटले जाते. याचे संक्रमण नोरोव्हायस आणि रोटाव्हायरससारख्या बॅक्टेरियांमुळे होते. या गंभीर आजारावर दिल्लीतील सी.के बिर्ला हॉस्पीटलमधील जीआय आणि बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेचे तज्ज्ञ डॉ. सुखविंदर सिंह सग्गू यांनी सविस्तर चर्चा केली. या चर्चेत हिवाळ्यात या आजारापासून वाचण्याचे उपाय सुद्धा त्यांनी सांगितले.
हिवाळ्यात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल संसर्गाचा धोका वाढत असल्याचं डॉक्टरांनी या चर्चेत सांगितलं. या ऋतूत व्हायरस, जीवाणू आणि बॅक्टेरियांच्या संख्येत वाढ होत असते आणि याचा परिणाम थेट शरीराच्या पचनसंस्थेवर होतो. डॉ. सग्गू यांच्या मते, या गंभीर आजाराला नोरोव्हायरस आणि रोटाव्हायरससारखे व्हायरस कारणीभूत असतात. या घातक व्हायरसचा प्रसार दूषित पाणी आणि दूषित जेवणाच्या माध्यमातून होतो.
वाढत्या जीआयच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी स्वच्छतेच्या बाबतीत नेहमी सतर्क राहिले पाहिजे. डॉ. सग्गू यांच्या मते, या संक्रमणापासून दूर राहण्यासाठी वारंवार हात धूतले पाहिजेत. तसेच, ज्या भागाला आपला सतत स्पर्श होत असतो, असे ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजेत.
हे ही वाचा: पिस्ता हे मधुमेहावरील रामबाण उपाय; पण मग ते इतकं महाग का? कारण अतिशय महत्त्वाचं
या संक्रमणापासून वाचण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी आहारात फळे, पालेभाज्या आणि प्रोबायोटीक्स असलेल्या पदार्थांचा समावेश असायला हवा. तसेच, भरपूर पाणी प्यायल्याने आणि शरीराला पुरेशी झोप मिळाल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते.
जीआयच्या आजारामुळे संक्रमित असलेल्या व्यक्तींचा जवळीक संपर्क टाळा. तसेच, आपल्या वैयक्तिक वस्तूंचा वापर आपल्यापुरताच मर्यादित ठेवा आणि दुसऱ्यांच्या वैयक्तिक वस्तूंचा वापर करणे टाळा. वरीलपैकी जीआय संक्रमणाची लक्षणे जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)