टीम इंडियाच्या युवा खेळाडूसोबत एअरपोर्टवर गैरवर्तन; पोस्ट करून सांगितली सगळी घटना

Cricket News : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. 

पुजा पवार | Updated: Jan 13, 2025, 05:49 PM IST
टीम इंडियाच्या युवा खेळाडूसोबत एअरपोर्टवर गैरवर्तन; पोस्ट करून सांगितली सगळी घटना title=
(Photo Credit : Social Media)

Abhishek Sharma : भारताच्या क्रिकेट संघातील युवा ऑलराऊंडर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याच्या सोबत दिल्ली एअरपोर्टवर गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिषेक शर्माने स्वतः इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून घडलेली घटना समोर आणली. अभिषेक सुट्टी घालवण्यासाठी जात असताना दिल्ली एअरपोर्टवर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तवणुकीमुळे त्याची फ्लाईट मिस झाली, एवढंच नाही तर यानंतर एअरलाईन्सकडून त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. अभिषेकने इंडिगोच्या कर्मचाऱ्यांवर थेट आरोप करून पोस्टमध्ये सर्व घटनाक्रम लिहिला. अभिषेक शर्मा याला इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टी 20 सीरीजसाठी टीम इंडियात निवडण्यात आले आहेत, त्यामुळे 22 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या या सीरिजमध्ये तो खेळताना दिसेल. 

अभिषेकने सांगितला घटनाक्रम : 

अभिषेकने इंस्टाग्रामवर सोमवारी सकाळी एक स्टोरी शेअर केली. यात त्याने लिहिले की, "दिल्ली एअरपोर्टवर इंडिगो सोबत माझा फार वाईट अनुभव होता. येथील स्टाफची वागणूक पटण्यासारखी नव्हती. मी योग्य काउंटरवर वेळेत पोहोचलो होतो, परंतु मला अनावश्यक कारण देऊन दुसऱ्या काउंटरवर पाठवण्यात आले. त्यानंतर मला सांगण्यात आले की  चेक-इन बंद झालं आहे. त्यामुळे माझी फ्लाईट सुटली. माझ्याकडे फक्त एक दिवसाची सुट्टी होतो, जी आता व्यर्थ गेली आहे. अभिषेकच्या या स्टोरीचा स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल होतं असून यावर कमेंट करून चाहते विमान प्रवासादरम्यान त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल व्यक्त होत आहेत". 

22 जानेवारीपासून सुरु होणार भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सीरिज : 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. यासाठी अभिषेक शर्माची टीम इंडियात निवड करण्यात आली असून त्याने यापूर्वी भारताकडून खेळताना अनेक सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. इंग्लंड सीरिजपूर्वी तो सुट्टीसाठी चालला होता. पण उड्डाण चुकल्यामुळे तो जाऊ शकला नाही. याविषयीची तक्रार त्याने समाजमाध्यमातून व्यक्त केली. अभिषेक शर्माने भारताकडून 12 आंतरराष्ट्रीय टी २० सामने खेळलेले आहेत.  यात त्याने 256 धावा केल्या असून यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. तर ऑल राउंडर असलेल्या अभिषेकने 3 विकेट्स देखील घेतले. 

abhishek sharma on indigo

भारतीय संघ (इंग्लंड टी 20 सीरिज) :

संजू सॅमसन (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जूरेल (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्थी, वॉशिंग्टन सुंदर

भारत विरूद्ध इंग्लंड टी 20 सीरिज वेळापत्रक : 

22 जानेवारी : पहिला सामना, (इडन गार्डन, कोलकाता)

25 जानेवारी : दुसरा सामना, (एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई)

28 जानेवारी : तिसरा सामना, (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, राजकोट) 

31 जानेवारी : चौथा सामना, (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे) 

2 फेब्रुवारी : पाचवा सामना, (वानखेडे स्टेडियम, मुंबई)