सावधान! दुपारच्या जेवणावेळी 'या' चुका करताय? डायबिटीस तुमच्यापासून फार दूर नाही...

Blood Sugar and Lunch Mistakes : मधुमेह... भारतीयांपुढं असणारी एक मोठी आरोग्यविषयक समस्या. अशा या मधुमेहापासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींचं पालन केल्यासही मोठी मदत मिळते.   

सायली पाटील | Updated: Jan 17, 2025, 12:28 PM IST
सावधान! दुपारच्या जेवणावेळी 'या' चुका करताय? डायबिटीस तुमच्यापासून फार दूर नाही...  title=
Lunch time Mistakes might lead to increase Blood Sugar

Blood Sugar and Lunch Mistakes : आरोग्यविषयक अनेक गोष्टींबाबत मागील काही वर्षांमध्ये सामान्य नागरिकांमध्येसुद्धा सजगता पाहायला मिळाली आहे. फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात सध्या अतिशय झपाट्यानं वाढणारी आणि चिंता वाढवणारी एक शारीरिक व्याधी म्हणजे, मधुमेह किंवा डायबिटीस. (Diabetes)

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO च्या वतीनंही डायबिटीसविषयी चिंतेचा सूर आळवला असून, एकट्या भारतातच या व्याधीनं जवळपास 10 कोटींहून अधिकजणांना ग्रासलं आहे. या मधुमेहाचेही असंख्य प्रकार असून, त्याची काही प्रकार हे थेट दैनंदिन जीवनशैलीशी संबंधित आहेत. टाइप 2 डायबिटीसही (Type 2 Diabetes) त्याचाच एक भाग. 

असंतुलित आहार, अती तणाव, शारीरिक श्रमाची शून्य कामं, अपूर्ण झोप या सवयींमुळं मधुमेहाचा धोका बळावतो. मधुमेह संपूर्णपणे बरा होत नसला तरीही त्यावर नियंत्रण नक्कीच ठेवता येतं. यामध्ये आहाराविषयक सवयी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. 

सकाळच्या न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत बरीच मंडळी योग्य काळजी घेतात. पण, दुपारच्या जेवणाकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होतं आणि याच कारणामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण असंतुलित होतं. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे दुपारच्या जेवणाच्या बाबतीत फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तरीही मधुमेह दूर किंवा अटोक्यात ठेवता येतो. 

जेवणात सतत बाहेरचं खाणं 

जास्तीचं काम, कमी वेळ आणि अशाच कैक कारणांमुळे अनेकदा दुपारच्या जेवणात पिझ्झा, समोसा या किंवा अशाच कैक पद्धतीच्या पदार्थांचं सेवन केलं जातं. मधुमेह असणाऱ्यांसाठी किंवा तो होण्याचा धोका असणाऱ्यांसाठी ही अत्यंत वाईट सवय. फास्ट फूड, बाहेरील पदार्थ यांमध्ये मीठ, साखर आणि इतर प्रीजर्वेटिव्सचं प्रमाण जास्त असल्यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळतं. 

जेवणानंतर सोडा किंवा तत्सम पेय पिणं 

अनेकांनाच दुपारच्या जेवणानंतर सोडा किंवा एरिएटेड ड्रींक पिण्याची सवय असते. पण, या सवयीमुळं रक्तातील नैसर्गिकर साखरेचं प्रमाण असंतुलित होतं. 

हेसुद्धा वाचा : साधुसंत दाढी, केस आणि जटा का वाढवतात? प्रेमानंद महाराजांनी स्पष्ट सांगितलं... 

असंतुलित आहार 

अनेकजण दुपारच्या जेवणात आरोग्यदायी पर्याय निवडत नाहीत. जेवणात प्रथिनं, फळं, भाज्या यांचा योग्य समतोल राखला जात नाही. ही मंडळी फक्त पोट भरण्यासाठीच दुपारचं  जेवण जेवतात. थोडक्यात आहारातील याच बेजबाबदारपणामुळंही (Blood Sugar Level) रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्यानं वाढून कैक समस्या भेडसावतात. 

(वरील माहिती सामान्य, उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24तास याची खातरजमा करत नाही. आहार किंवा आरोग्यविषयक सल्ल्यासाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा. )