मुंबई : मुंबईत कोरोना रूग्णांची वाढ संख्या लक्षात घेता रूग्णांना घरच्या घरी वैदयकीय उपचार मिळावेत, यासाठी आता परळ येथील ग्लोबल रूग्णालयाने ‘होम केअर सुविधा’ सुरू केली आहे. या सुविधेद्वारे रूग्णाला नेमका काय आणि किती त्रास होतोय, हे लक्षात घेऊन त्याला रूग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, याची खात्री झाल्यानंतर रूग्णावर घरीच उपचार दिले जाणार आहेत. याकरता रूग्णालयाद्वारे आता पायोनिरींग टेरिटरी केअर हॉस्पीटल्स हा नवा उपक्रम सुरू करण्यात आलाय.
कोरोनानं जगभरात अक्षरशः थैमान घातले असून रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. कोरोनाबाधितांना दाखल करून घेण्यासाठी रूग्णालयतही खाटा उपलब्ध होत नसल्याचे चित्र पाहायला मिळतंय. बऱ्याचदा खाटांसाठी रूग्णांच्या नातेवाईकांना पायपीट करावी लागतेय. वेळीच उपचार न झाल्यास रूग्ण दगावतोय. हे जाणून राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेवर वाढता ताण कमी करण्यासाठी आता अतिसौम्य लक्षणे असलेल्या किंवा कुठलीही लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णां त्यांच्या संमतीनुसार होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. यावरून कोरोना रूग्ण घरीच उपचार घेत आहे. त्यानुसार आता ग्लोबल रूग्णालयाने रूग्णांचे हितासाठी ‘होम केअर सेवा’ द्यायला सुरूवात केली आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एखादा रूग्ण कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्यास त्यांच्यात दिसणाऱ्या लक्षणांचे मुल्यांकन केले जाणार आहे. रूग्णाला नेमका काय आणि किती त्रास होतोय, हे त्यावरून लक्षात येतं त्याला दाखल करायची गरज नाही, याची खात्री झाल्यानंतर रूग्णाला होम केअर सेवा पुरवली जाईल. त्यानंतर त्यांना घरातच योग्यपद्धतीने उपचार दिले जाणार आहेत. यासाठी पायोनिरींग टेरिटरी केअर हॉस्पीटल्स या कार्यक्रमासाठी त्यांची नावनोंदणी आणि पोर्टलमध्ये समावेश केला जाईल. त्यात नाडीचा अभ्यास आणि वेळेवर रूग्णाच्या शरीराच्या तापमान तपासणीचा समावेश आहे. या डेटाचे परिक्षण दररोज डॉक्टर आणि नर्सेसची टीम करेल. याशिवाय कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रूग्ण डॉक्टरांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून उपचाराबाबत सल्लामसलत करू शकतो.
याबाबत बोलताना ग्लेनिगल्स ग्लोबल रूग्णालयाचे प्रकल्प संचालक आणि इन्फेक्शन कंट्रोल अँडव्हायझरी बोर्डाचे चेअरमन डॉ. सुब्रमण्यम स्वामीनाथन म्हणाले की, ‘‘कोरोना पॉझिटिव्ह असणारे अनेक रूग्ण रूग्णालयात न जाता घरीच उपचार घेऊन बरे होणं पसंत करत आहेत. अशा रूग्णांसाठी त्यांच्या इच्छेनुसार आता घरच्या घरी वैद्यकीय उपचार देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी होम केअर सेवा सुरू करण्यात येत आहे. यासाठी डॉक्टर व नर्सेस रूग्णावर त्यांच्या घरी उपचार करताना सर्व प्रकारची सुरक्षितता बाळगत आहेत. १४ दिवस हे वैद्यकीय उपचार सुविधा दिली जाणार आहे. दररोज पाठपुरावा आणि रूग्णांची काळजी काय करावे आणि काय करू नये, याबाबत या प्रोग्रामद्वारे नातेवाईकांना सूचित केले जाईल.’’
कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध
या रूग्णांचे घरातच विलगीकरण केले जाईल
पायोनिरींग टेरिटरी केअर हॉस्पीटल्स या कार्यक्रमात नावनोंदणी केल्यावर रूग्णाला होम मॉनिटरिंग किट दिली जाईल
यात किटमध्ये डिजिटल थर्मामीटर, ऑक्सिमीटर, हातमोजे, सॅनिटायझर, मास्क आणि रेकॉर्डिंग शीटचा समावेश आहे.*
सध्याच्या स्थितीत आरोग्य कसे जपावेत, याबाबत बोलताना इंडिया ऑपरेशन्स विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम विजयकुमार म्हणाले की, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांची आमची जबाबदारी समजून त्यांची काळजी घेत आहोत. या नव्या उपक्रमाद्वारे दररोज रूग्णाची देखरेख करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व रूग्णांना उत्तम दर्जाचे उपचार उपलब्ध करून देत आहोत.’