मुंबई : स्तनपानाबाबत अजूनही लोकांच्या मनात टॅबू आहे. हा टॅबू दूर करण्यासाठी स्तनपानासंदर्भात जनजागृती करण्यात येतेय. मात्र एका महिलेला गाडी थांबवून बाळाला स्तनपान देणं फार महागात पडलं आहे. इंग्लंडमध्ये ही घटना घडली असून स्तनपान दिल्यानंतर तिला दंड भरावा लागला आहे.
गाडी थांबवून स्तनपान दिल्याने या महिलेला 170 पाऊंड म्हणजे 17,493 रूपयांचा दंड भरावा लागला आहे. या महिलेचं नाव अमांडा रग्गेरी आहे. वास्तविक अमांडा रग्गेरी न्यूक्वे गोल्फ क्लबच्या बाहेर संध्याकाळी सुमारे 20 मिनिटे उभी होती. तिची मुलगी रडू लागली म्हणून तिने गाडी एका ठिकाणी उभी केली आणि मुलीला दूध पाजलं.
मात्र अमांडाने ज्या ठिकाणी गाडी उभी केली होती तिथे गाडी पार्क करणं अधिकृत होतं. दूध पाजल्यानंतर अमांडा आणि तिचा पती गाडी घेऊन पुढे निघून गेले. एका आठवड्यानंतर, त्यांना स्मार्ट पार्किंग लिमिटेड कडून मेसेज मिळाला. ज्यामध्ये दंड भरण्याचा उल्लेख केला होता. या मेसेजमध्ये म्हटलं होतं की, त्यांनी बेकायदेशीरपणे गाडी 21 मिनिटे पार्क केली होती. ज्यामुळे त्यांना आता दंड भरावा लागेल.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जवळच्या पर्यटन स्थळ माउसहोलच्या समुद्रकिनाऱ्यावर एक रात्र राहण्याच्या खर्चापेक्षा जास्त खर्च पार्किंग केल्याबद्दल ठोठावण्यात आला.