हैदराबाद : तोंडात केरोसिन भरुन रिअॅलिटी शोप्रमाणे स्टंट करण्याच्या प्रयत्नात 11 वर्षाच्या चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला.
रिअॅलिटी शोमध्ये होणारे बहुतांश स्टंट हे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले जात असतात. घरी असे करण्याचा प्रयत्न करु नका असेही वारंवार सांगण्यात येत असते. पण याची समज नसलेल्या लहान मुलांचा स्टंट कॉपी करण्याच्या नाद जीवावर बेततो. अशीच एक दुर्देवी घटना तेलंगणामध्ये घडली आहे. यामध्ये 11 वर्षाच्या मुलाने आपला जीव गमावला आहे.
रापल्ले काली विश्वनाथ असे त्याचे नाव असून तो सहावीमध्ये शिकत होता. तीन दिवसांपुर्वी त्याने टीव्हीवर रात्री उशिरा आगीचा एक स्टंट पाहिला होता. आपणही असा स्टंट करु शकतो या विश्वासात त्याने प्रयत्न केला पण त्याचा हा प्रयोग त्याच्या जीवावर बेतला.
बोर्डिंग शाळेत शिकणारा रापल्ले आजीसोबत सुट्ट्या घालण्यासाठी आला होता. त्याला नेहमी नवीन गोष्टींचं कुतुहूल वाटत असे असं त्याच्या पालकांनी सांगितले. रापल्लाने आगीचे गोळे काढण्यासाठी सर्वात आधी तोंडात केरोसिन भरलं. यानंतर ज्याप्रमाणे सर्कसमध्ये तोंडातून केरोसिन उडवत आगीचे गोळे काढले जातात तसा प्रयत्न केला. मात्र हा स्टंट फसला. आगीचे गोळे हवेत उडण्याऐवजी त्याच्या शरीराने पेट घेतला. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर हैदराबादला हलवण्यता आलं. त्याची अवस्था अत्यंत नाजूक होती. अखेरीस शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
पाल्याला वेळीच समज देणे महत्त्वाचे
जेव्हा कधी टीव्हीवर तो एखादा स्टंट पाहत असे, तेव्हा घरी कोणीही नसताना तो ते करुन पाहत असे असंही त्याच्या पालकांनी सांगितले. दरम्यान अशा प्रकारचे स्टंट करत असताना पालकांनी त्याला वेळीच रोखले असते किंवा तशी समज दिली असती तर आज हा प्रसंग ओढावला नसता अशी चर्चा सुरु आहे.