12 years boy Left House: १२ वर्षांच्या मुलासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रागाच्या भरात घरातून निघून गेल्यानंतर जंगलात त्याचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडला आहे. कुत्र्यांनी त्याच्या अर्ध्या शरिराचे लचके तोडल्याचेही आढळले आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून मुलाचे कुटुंबीय मात्र या घटनेने हादरले आहेत.
मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील हा प्रकार घडला आहे. सूरज पटेल असं मृत मुलाचे नाव आहे. सूरजचे वडिल पप्पू पटेल यांनी त्याला मोबाइलचा वापर करण्यास रोखले होते. याचाच राग त्याच्या मनात होता. दोन दिवसांपूर्वी रागाच्या भरात त्याने घर सोडले होते. सूरज घरातून निघून गेल्यानंतर त्याच्या वडिलांनी आणि नातेवाईकांना त्याचा परिसरात शोध घेतला. मात्र, तो कुठेही सापडला नाही. अखेर त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
सूरजचे वडिल पप्पू पटेल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सूरजचा मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. त्यामुळं तो पूर्ण दिवस मोबाइलवर गेम खेळत व सोशल मीडियाचा वापर करत बसायचा. यावरुन वडिलांनी त्याला दम दिला त्यावर तो रागावून घरातून निघून गेला. तो घरातून निघून गेल्यावर खूप शोधाशोध केली मात्र, त्याचा कुठेच शोध लागला नाही. अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार केली.
गोव्याच्या किनाऱ्यावर लग्न करण्याचं स्वप्न बघताय; मग तुमच्यासाठी महत्त्वाची आहे
२४ तास उलटूनही सूरज घरी परतला नसल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. शनिवारी जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या काही महिलांना एका मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.
सूरजचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगितले. त्यांनीही हाच सूरजच असल्याचे सांगितले. दरम्यान, जंगलात कुत्र्यांनी त्याच्या अर्ध्या शरिराचे लचके तोडले आहेत. तर, त्याच्या गळ्यात एक दोरी बांधलेलीही आढळली आहे. त्यामुळं पोलिसांचा संशय वाढला आहे. सूरजचा मृत्यू नेमका कशामुळं झाला याचा शोध पोलिस घेत आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झालाय का किंवा कोणी हत्या करुन त्याचा मृतदेह जंगलात फेकला आहे का?, याचा तपास पोलिस करत आहेत.
लातुरमध्ये खळबळ! तलावाशेजारी सापडला मानवी हाडांचा सांगाडा; ४ महिन्यांपूर्वीच्या 'त्या' घटनेशी संबंध?
दरम्यान, सूरज त्याच्या वडिलांसह आणि दोन बहिणींसह राहत होता. मुलांची आई काही वर्षांपूर्वी त्यांना सोडून गेली आहे. सूरजच्या निधनाची बातमी ऐकताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.