15 Year Old Kerala Teen Dies Actress Insta Story: केरळमधील कोचीमधल्या खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेत वारंवार होणाऱ्या रँगिंग आणि धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत वरिष्ठांकडून वारंवार होणाऱ्या अपमानाला कंटाळलेल्या या विद्यार्थ्याने 15 जानेवारी रोजी घरी आल्यावर आत्महत्या केली. मुलाला टॉयलेट सीट चाटायला लावली, तसंच फ्लश केल्यानंतर त्याचं डोकं टॉयलेटमध्ये बुडवलं असे आरोप मृत मुलाच्या आईने केले असून यामुळे केरळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. असं असतानाच या प्रकरणावर आता आघाडीची दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू व्यक्त झाली आहे. तिने या प्रकरणी न्याय मागतानाच एक महत्त्वाचं आव्हान केलं आहे.
थ्रिपुनिथुरा येथील हिल पॅलेस पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये मिहीर नावाच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच मृत्यूबद्दल समंथाने चिंता व्यक्त केली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन भावना व्यक्त केल्या आहेत. "या बातमीने मी पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे", या मथळ्याखाली समंथाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये समथांने पुढे, "आपण 2025 मध्ये आहोत तरी आपण एक तरुण जीव गमावला तो केवळ काही व्यक्तींमधील द्वेष आणि विषारी विचारसरणीमुळे. त्यांच्यामुळेच त्याने (मिहीरने) टोकाचा निर्णय घेतला," असं म्हटलं आहे.
"मिहीरचा दुर्देवी मृत्यू हा आपल्याला बुलिंग, छळ आणि रँगिंगविरुद्ध दिलेला इशारा आहे. या गोष्टींकडे आपण 'काहीही परिणाम न होणाऱ्या परंपरा' किंवा 'प्रवेशापूर्वीची परंपरा' असं म्हणत कानाडोळा करु शकत नाही हेच दर्शवतात. या गोष्टी हिंसकच आहेत. सायकोलॉजिकली, इमोश्नली आणि कधीतरी अगदी फिजिकलीही त्याचा फटका बसतो. आपण रॅगिंगविरोधातील कायदे कठोर केले आहेत. तरीही आपल्या विद्यार्थ्यांना हे सारं सहन करावं लागतं. ते बोलायला घाबरतात. याचा काय परिणाम होईल याला ते घाबरतात. आपलं कोणी ऐकून घेणार नाही याची त्यांना भिती असते. आपण कुठे कमी पडतोय?" असा सवाल समंथाने विचारला आहे.
नक्की वाचा >> ...म्हणून कंपनी लपूनछपून आपल्या कर्मचाऱ्यांचे टॉयलेटमधील फोटो काढून भिंतीवर चिटकवले
"केवळ श्रद्धांजली देऊन हे प्रकरण थांबण्यासारखं नाही. या प्रकरणात कठोर कारवाई केली पाहिजे. मला अपेक्षा आहे की यंत्रणा याच्या तळाशी जातील आणि यंत्रणांकडून सत्याचा आवाज दाबला जाणार नाही. मिहीरला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या पालकांना हे प्रकरण निकाली निघताना बघण्याचा हक्क आहे. कठोर आणि तातडीने कारवाई केली गेली पाहिजे," अशी अपेक्षा समंथाने व्यक्त केली आहे. "माझ्या सर्व तरुण मित्रांना विनंती आहे की तुम्हाला कुठेही बुलिंग होताना दिसलं तर त्याविरुद्ध बोला. पुढे या आणि आवाज उठवा. जे बळी पडलेत त्यांच्या पाठीशी उभे राहा. तुमच्या शांततेमुळे चुकीच्या व्यक्तींना बळ मिळतं. तुमच्यावर बुलिंग होत असेल तर मतद घ्या. यामधून बाहेर निघता येतं," असंही समंथा म्हणाली. "आपल्या मुलांना सौदार्य आणि दयाळूपणा आणि भितीपुढे शरण न जाण्याची शिकवण देऊयात," असंही समंथा म्हणाली आहे.
"मिहीरचा मृत्यू हा आपल्यासाठी खडबडून जागं होण्याचा इशारा असावा. त्याला न्याय मिळाला तर इतर कोणत्याही विद्यार्थ्याला याच वेदनांमधून पुन्हा जावं लागणार नाही. आपण त्याला एवढा न्याय मिळवून देणं तर भाग आहे," असं पोस्टच्या शेवटी समंथाने म्हटलंय. पोस्टच्या शेवटी समंथाने मिहीरला न्याय द्या असं सांगणारा #JusticeForMihir हा हॅशटॅग वापरला आहे.