400 Year Old ShivMandir: भारतातील अनेक मंदिरांचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. तसंच, भारतात असेही काही मंदिरे आहेत त्यांची रहस्य अद्याप उलगडली नाहीत. तर, अनेक मंदिरांबाबतचे गूढ कायम आहे. दक्षिण भारतमधील एका मंदिराबाबतही एक रहस्य कायम आहे. सोशल मीडियावर एका मंदिराचे खोदकाम करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. बेंगळुरुतील श्री दक्षिणामुख नंदी तीर्थ कल्याण क्षेत्र येथील हा व्हिडिओ आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, खोदकाम करत असताना नंदी महाराजची एक मूर्ती सापडली आहे. त्यानंतर पूर्ण मंदिरच जमिनीखालून बाहेर आलं आहे. इन्स्टाग्रामवर religioussanatani या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यातबरोबर या मंदिराविषयी माहितीदेखील देण्यात आली आहे.
व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, जेव्हा काही मजूर या परिसरात खोदकाम करत होते तेव्हा खाली त्यांना आकृतीसारखी एक वस्तू लागली. त्यानंतर तेव्हा संपूर्ण खोदकाम केले गेले तर जमिनीखाली नंदीची प्रतिमा सापडली. आश्चर्य म्हणजे, या नंदीच्या मुखातून सातत्याने पाणी खाली वाहत होते. हे पाणी कुठून वाहतेय याचा शोध मात्र काही लागला नाही.
नंदीच्या मुखातून पाणी कुठे पडते याचा शोध घेण्यासाठी आणखी खोदकाम करण्यात आले. तेव्हा जमिनीच्या खाली एक शिवलिंग असल्याचे आढळले. त्यावर नंदी अभिषेक करतात. जमिनीखालून नंदीची मूर्ती आणि शिवलिंग आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर राज्य सरकारनेही याबाबत चौकशी करण्यात आली. घटनास्थळी पुरातत्व विभागाची टीमही दाखल झाली.
1997 साली हे शिवलिंग आणि नंदीची मूर्ती सापडली होती. या परिसरात आणखी खोदकाम करण्यात आल्यानंतर संपूर्ण मंदिरच समोर आले. पुरातत्व विभागाकडून मंदिराचा इतिहास आणि वय जाणून घेण्यासाठी कार्बन डेटिंग करण्यात आली. तेव्हा हे मंदिर 400 वर्ष जुने असल्याचे समोर आले. व गेली कित्येत वर्षे हे मंदिर जमिनीखाली होते. 1997 साली हे मंदिर पुन्हा समोर आले आहे.
इन्स्टाग्रामवरील व्हिडिओला कॅप्शन देताना त्याने म्हटलं आहे की, हे मंदिर कर्नाटक राज्यातील बेंगळुरु शहरातील उत्तर-पश्चिमी क्षेत्रातील मल्लेश्वरम लेआउटच्या दुसऱ्या मंदिरातील दुसऱ्या टेंपल स्ट्रीटवरील कडू मल्लेश्वर मंदिराच्या विरुद्ध आहे. मंदिराला नंदी तीर्थ, नंदीश्वर तीर्थ, बसव तीर्थ किंवा फक्त मल्लेश्वरम नंदी गुढी असेही म्हणतात.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे. एका युजरने म्हटलं आहे की, इथे खूप शांती मिळते. हे अद्भूत आहे. तर, एकाने म्हटलं आहे की, जमीनीच्या आत खूप काही दडलं आहे ज्याच्याबद्दल आपल्याला काहिच माहिती नाहीये.