Divroce News: लग्न केल्यानंतर जेव्हा सुखी संसारात घटस्फोट या शब्दाचा उल्लेख होतो, तेव्हा सर्व काही आलबेल नाही हे समजावं. घटस्फोट म्हणजे दोघे जोडीदार आपल्या संसारात आनंदी नाहीत आणि आता त्यांना स्वतंत्रपणे जगायचं आहे असाच अर्थ होतो. त्यामुळे घटस्फोट घेतल्यानंतर दोघेही पती-पत्नी एकत्र राहत नाहीत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे घटस्फोट घेतल्यानंतरही पती-पत्नीने एकाच छताखाली राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील कारण ऐकलं तर तुम्हीदेखील डोक्यावर हात मारुन घ्याल.
लखनऊ येथील या दांपत्याचं सहा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पण लग्नाच्या सहा वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेत आपला संसाररुपी एकत्र प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला. पण घटस्फोट घेतल्यानंतरही दोघांनी एकाच घरात, एकाच छताखाली राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सहा वर्षांपूर्वी या जोडप्याने प्रेमविवाह केला होता. पण लग्नानंतरच्या निर्बंधांना कंटाळून दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. कोर्टानेही त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. पण दोघे जेव्हा कोर्टात आदेशाची प्रत घेण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी आपण घटस्फोट घेतला असला तरी एकाच घरात राहणार आहोत असं सांगितलं. यानंतर तिथे उपस्थित सर्वांच्यात भुवया उंचावल्या. पण त्यांनी यामागील अजब कारणही सांगितलं आहे.
घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यामधी पती निमलष्करी दलात तैनात आहे. पत्नी लखनऊमधील एका प्रतिष्ठीत कार्यालयात काम करते. दोघेही बलिया येथे राहणारे आहेत. 2017 मध्ये दोघांनी प्रेमविवाह केला होता. यानंतर ते लखनऊत येऊन राहू लागले होते. लग्नानंतर दोघांमध्ये काही ना काही कारणावरुन भांडण होत होतं. दोघांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत होता. लग्नानंतर घातले जात असलेले निर्बंध पत्नीला पसंत पडत नव्हते. आपण यातून स्वतंत्र व्हावं अशी तिची इच्छा होती. यामुळे तिने पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या आग्रह आणि दबावामुळे पतीही घटस्फोट देण्यास तयार झाला.
सप्टेंबर 2022 मध्ये जोडप्याने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. जवळपास एक वर्षांने 15 जुलैला लखनऊच्या कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी दिली. पती-पत्नी कोर्टाच्या आदेशाची प्रत घेण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर आपण आनंदी आहोत. मात्र तरीही आम्ही वेगळे होणार नाही असं सांगितलं.
याचं कारण सांगताना ते म्हणाले की, समाजाला दाखवण्यासाठी आम्ही एकत्रच राहणार आहोत. आता आम्ही एकाच छताखाली राहणार आहोत, पण पती-पत्नी हे नातं नसेल. आपले शेजारी, नातेवाईक आणि समाजाकडून टोमणे ऐकायला लागू नयेत म्हणून जोडप्याने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. आपण घटस्फोट घेतला आहे याची कोणालाच माहिती मिळू नये अशी त्यांची इच्छा आहे.
यासंबंधी ज्येष्ठ वकील दिव्या मिश्रा यांनी सांगितलं आहे की, आपण आपल्या करिअरमध्ये असं प्रकरण कधी पाहिलेलं नाही. जेव्हा कधी जोडपी घटस्फोट घेतात तेव्हा त्यांना एकमेकांचा चेहराही पाहायचा नसतो. पण या जोडप्याने समाजाचं बोलणं ऐकण्यापासून वाचण्यासाठी घटस्फोट झाल्यानंतरही एकत्र राहण्याचं ठरवलं आहे.