नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायु सेनेचे एअर कमांडर अभिनंदन वर्तमान काही वेळात भारतात पोहोचतील. भारताला सोपावण्याआधी पाकिस्तानतर्फे त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. भारतीय वायुसेनेचे अधिकारी वाघा बॉर्डरवर त्यांना आणण्यासाठी वाघा बॉर्डरवर पोहोचले आहेत. संपूर्ण देशात अभिनंदन यांच्या घरवापसीचा आनंद साजरा केला जात आहे. पण भारतात परतल्यानंतर पुढचे काही दिवस अभिनंदन यांच्यासाठी आव्हानाचे असणार आहेत. त्यांना काही चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये अशी पण एक चाचणी असेल जी अयशस्वी झाल्यास त्यांना नोकरी देखील गमवावी लागू शकते. पण अभिनंदन यांनी आपल्या तल्लख बुद्धीमत्तेचा नजराणा सीमेपलीकडून केव्हाच दिला आहे. त्यामुळे या चाचण्याही ते यशस्वी पार करतील यात काही शंका नाही.
भारतीय वायुसेनेच्या नियमांनुसार त्यांना काही कडक चाचण्यांमधून जावे लागेल. मेडीकल टेस्ट, फिटनेस टेस्ट, मनोवैज्ञानिक आणि स्कॅनिंग चाचण्या याचाच एक भाग आहे. पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशी काही कार्यवाही केली आहे का ? याची पडताळणी देखील यामध्ये होईल. त्यामुळे हे ऐकायला जरी कटू वाटत असले तरी अभिनंदन यांना या चाचण्या पार पाडाव्या लागतील.
अभिनंदन हे दुश्मनांच्या जमिनीवर एकटे होते. तिथे त्यांना कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षे संदर्भातील गुप्त माहितीसाठी त्यांना मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या त्रास दिला गेला असल्याची शक्यता आहे. यातून पाकिस्तानमध्ये त्यांच्या मानसिकतेवर आघात केला जाण्याची शक्यता आहे. त्यांची सध्याची मानसिक स्थिती काय आहे हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतीय वायुसेनेच्या इंटेलिजंसची डीब्रीफिंग खूप वेदना देणारी असते पण वायु सेनेच्या नियमांनुसार ती अनिवार्य देखील असते. दुश्मनांनी त्यांच्याकडून कोणती माहीती काढून घेतली हे जाणणे महत्त्वाचे असते. दुश्मन देशाच्या सेनेने त्यांना आपल्या बाजूने तर करुन घेतल नाही ? अशा शंकाचे निरसन होणे ही गरजेचे असते. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने या चाचणीला महत्व आहे.
शारिरीक आणि मानसिक चाचण्यांमध्ये यशस्वी झाल्यास ते पुन्हा कामावर रुजू होऊ शकतात. अभिनंदन यांनी केलेली कामगिरी खूप मोठी आहे त्यांचा सन्मान व्हायला हवा अशीच आशा देशभरातून व्यक्त होत आहे. त्यांची घरवापसी झाल्यावर त्यांना काही प्रश्न विचारले जातील पण त्याच आत्मविश्वासात अभिनंदन उत्तरे देतील असा विश्वास भारतीयांना आहे.