नवी दिल्ली: विरोधकांमधील दुहीचा योग्यवेळी फायदा उठवण्यासाठी 'वन नेशन वन इलेक्शन'ची योजना आखत असलेल्या भाजपच्या मनसुब्यांना सोमवारी राजस्थान व छत्तीसगढ येथील मतदानपूर्व चाचण्यांच्या (ओपिनियन पोल) निकालांनी मोठा धक्का बसला. एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांनी संयुक्तपणे केलेल्या या सर्वेक्षणाचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. या सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल व काँग्रेस सत्तेवर येईल.
मतदानपूर्व चाचण्यांचा हा कल निवडणुकीपर्यंत कायम राहिल्यास भाजपचे 'वन नेशन वन इलेक्शन'चे गणित पुरते फसू शकते. भाजपसाठी सुदैवाची बाब एवढीच की, या तिन्ही राज्यांतील नागरिकांनी पंतप्रधानासाठी पहिली पसंती नरेंद्र मोदी यांनाच दिली आहे.
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशात भाजपला ४० टक्के, काँग्रेसला ४२ तर इतरांना १८ टक्के मते मिळतील. यानुसार विधानसभेच्या एकूण २३० जागांपैकी काँग्रेसला ११७, भाजप १०६ तर इतर पक्षांना सात जागा मिळतील.
मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी येथील मतदारांनी भाजपला पसंती दिली आहे. लोकसभेत भाजपला ४६ टक्के, काँग्रेसला ३९ टक्के आणि इतरांना १५ टक्के मते मिळतील. तर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना ५४ टक्के तर राहुल गांधींना २५ टक्के जनतेने पसंती दिली आहे.
छत्तीसगढ
छत्तीसगढ विधानसभेच्या ९० जागांपैकी ५४ जागा काँग्रेस तर ३३ जागा भाजपला आणि अन्य पक्षांनी तीन जागांवर विजय मिळेल.
राजस्थान
राजस्थान विधानसभेच्या एकूण २०० जागांपैकी काँग्रेसला १३० जागांवर, भाजप ५७ आणि अन्य पक्षांना १३ जागांवर विजय मिळेल. मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गेहलोत यांना सर्वाधिक ४१ टक्के तर वसुंधरा राजे आणि सचिन पायलट यांना अनुक्रमे २४ आणि १८ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.