नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधल्या राजकीय घडामोडींमध्ये भोपाळ आणि दिल्लीत बैठकींचं सत्र सुरुच आहे. ज्योतिरादित्य शिंदिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. भाजप मुख्यालयात झालेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, नितीन गडकरी, थावरचंद गहलोत शाहनवाज हुसेन हे नेते उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योतिरादित्य शिंदिया १२ मार्चला भाजपमध्ये प्रवेश करु शकतात. दुसरीकडे भोपाळमध्ये काँग्रेस आणि भाजपची वेगवेगळी बैठकाही होत आहेत.
ज्योतिरादित्य शिंदिया यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. भाजपमध्ये प्रवेश करणाच्या चर्चांवर उत्तर देताना ज्योतिरादित्य यांनी फक्त 'हॅप्पी होली' अशीच प्रतिक्रिया दिली.
ज्योतिरादित्य शिंदिया मंगळवारी सकाळी स्वत: गाडी घेऊन घरातून बाहेर पडले. यानंतर गुजरात भवनमध्ये जाऊन त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर अमित शाह यांच्या गाडीत बसून ज्योतिरादित्य शिंदिया पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले.
सकाळी १०.४५ वाजता ज्योतिरादित्य शिंदिया पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. इकडे त्यांची जवळपास १ तास बैठक चालली. या बैठकीनंतर ज्योतिरादित्य शिंदिया यांनी काँग्रेसमधून राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ट्विटरवर ज्योतिरादित्य यांनी राजीनाम्याचं पत्र शेयर केलं. ज्योतिरादित्य शिंदिया यांचं हे पत्र ९ मार्चचं होतं, पण मंगळवारी याला सार्वजनिक करण्यात आलं.
जनसेवा करण्यासाठी मी राजकारणात आलो होतो, पण मागच्या काही काळापासून काँग्रेसमध्ये हे काम करता आलं नसल्याची खंत त्यांनी पत्रात मांडली आहे. १८ वर्ष ज्योतिरादित्य शिंदिया काँग्रेसमध्ये होते.