नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी मतमोजणी सुरू आहे. दोन्ही राज्यात भाजपचीच सत्ता येण्याची चिन्हं आहेत.
भाजपच्या विजयी घौडदौडीमुळे अनेक राजकीय नेते आश्चर्यचकीत झाले आहेत. भाजपच्या विजयाचं वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपच्या विजयातली विसंगतीवर बोट ठेवताना दिलेली प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे.
ते म्हणाले की, भाजप हा एक चमत्कारी पक्ष आहे. प्रत्येक निवडणुकीत भाजप मुख्य प्रश्नांवरून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यात यशस्वी होतो. या निवडणुकांमधून माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे, भाजपकडे लोकांची दिशाभूल करण्याची ताकद आहे. ही जादूची विद्या आम्हालाही शिकावी लागेल. जेव्हा कॉँग्रेस आणि सपा याच्यात पारंगत होईल तेव्हा आम्हालासुद्धा यश मिळेल.
अखिलेश यादव असंही म्हणाले कि मी जनतेच्या निर्णयाचं स्वागत करतो. जिंकणाऱ्याचा पराभव होत असतो आणि आता हरणारा पुढच्या वेळेस जिंकणार. राहुल गांधीनी पहिल्यांदाच सामाजिक गुंतागुंत इतक्या जवळून पाहिली आहे. ही त्यांच्यासाठी आणि कॉँग्रेससाठी चांगली गोष्ट आहे. उत्तर प्रदेशपेक्षा गुजरातमध्ये कॉँग्रेसची कामगिरी जास्त चांगली आहे.