मुंबई : कोरोनापासून (Coronavirus) अद्याप सुटका झालेली नाही. तोपर्यंत आणखी एका विषाणूमुळे चिंता वाढली आहे. केरळमध्ये झिका विषाणूच्या (Zika virus) संसर्गाबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये आतापर्यंत झिका विषाणूची 14 प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर कर्नाटक सरकारने झिकाचा प्रतिबंध आणि प्रसार यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. तसेच गरोदर महिलांसाठी अल्ट्रा साऊंड स्कॅनिंगच्यावेळी 'झिका'बाबत अशा लक्षणांवर विशेष लक्ष दिले पाहिजे. गरोदर महिलांना ताप असल्यास त्याची चाचणी करावी.
कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाने जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, हा मान्सूनचा हंगाम असल्याने डासांच्या पैदास होण्याची शक्यता जास्त आहे. सतत फवारणी आणि साफसफाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासह जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की -
1. लक्ष ठेवण्यासाठी पथकांची स्थापना. घरगुती, वैयक्तिक संरक्षणाच्या उपायांबरोबरच समुदाय आणि संस्थात्मक पातळीवर काळजी घेतली पाहिजे.
2. विमानतळ, समुद्री बंदरे, बंदरे यांच्या दोन किलो मीटरच्या आसपासमधील गाव, वाड्यांमध्ये एडीस अळ्या सापडण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी ट्रेसिंगवर भर देण्यात यावा.
3. या संदर्भात, साप्ताहिक अहवाल राज्य सरकारला पाठवावा. जिल्ह्यांनी आपापल्या विमानतळाच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय साधला पाहिजे.
झिकाच्या संसर्गानंतर ताप, शरीरावर पुरळ उठणे, conjunctivitis , सांधेदुखी इत्यादीसारखी लक्षणे जाणवू शकतात. प्रवासाचा इतिहास आणि ZVD सस्पेक्टच्या संपर्कांबद्दल माहिती आणि कॉन्टेक्ट याच्यासंदर्भात माहिती शोधली पाहिजे. संशयितांचे नमुने तपासले पाहिजे. एनआयव्ही, बेंगळुरु येथे तपासणीसाठी पाठविण्यात यावेत. गरोदर महिलांसाठी अल्ट्रा साऊंड स्कॅनिंगच्यावेळी अशा लक्षणांवर विशेष लक्ष दिले पाहिजे. ही लक्षणे कोणत्याही महिलेमध्ये आढळल्यास तत्काळ महिलांचे सीरम नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवावे.
दरम्यान, झिका विषाणूच्या परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आणि राज्य सरकारला या प्रकरणांच्या व्यवस्थापनात मदत करण्यासाठी तज्ज्ञांची 6 सदस्यीय केंद्रीय टीम केरळला पाठविली आहे. 24 वर्षांच्या गरोदर महिलेमध्ये गुरुवारी राज्यात या डासने चावल्यानंतर या आजाराची पहिली घटना समोर आली आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार एनआयव्हीने शुक्रवारी अशी आणखी 13 घटनांची पुष्टी केली. अशाप्रकारे, शुक्रवारी झीका विषाणूच्या संसर्गाची एकूण प्रकरणे 14 पर्यंत वाढली.
जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्याचे आरोग्यमंत्री म्हणाले की, गरोदर महिलांना ताप असल्यास त्याची चाचणी करावी. दिल्लीतील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, झिकाची काही प्रकरणे केरळमधून आली आहेत. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि राज्य सरकारला मदत करण्यासाठी आणि झिका व्यवस्थापित करण्यासाठी राज्य सरकारला मदत करण्यासाठी सहा सदस्यांच्या टीमला तेथे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, डासांमुळे होणाऱ्या आजारांमधील तज्ज्ञ आणि एम्सचे तज्ज्ञ आदींचा समावेश आहे.