पारनेर (जि. अहमदनगर) : आज गांधी जयंतीच्या दिवशी समाजसेवक अण्णा हजारे राजघाटवर एक दिवसाचे आंदोलन करणार आहेत. ते सकाळीच पुण्याहून दिल्लीला पोहोचत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल व स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन होणार आहे.
दिल्लीतील राजघाट येथे महात्मा गांधींच्या प्रेरणास्थळावर अण्णा हजारे श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. त्यानंतर लोकपाल आणि शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा अशी मागणी करणार आहेत़
लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करा व शेतमालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी अण्णांनी तीन वर्षांपासून पंतप्रधानांना सातत्याने पत्र पाठविलीआहेत.
पण पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त कार्यवाही सुरू असल्याचे त्रोटक उत्तर देण्यात आल्याचा आरोप अण्णांनी केला. तसेच पंतप्रधानांचे भाषण व कृती वेगळी आहे, अशी टीकाही अण्णांनी याआधी केली आहे.