आसारामने भक्तांना तुरूंगातून लिहिली चिठ्ठी, दिला हा संदेश

लैंगिक शोषण प्रकरणी निकाल लागण्याआधी आसारामने भक्तांना एक चिठ्ठी लिहिली आहे.

Updated: Apr 23, 2018, 06:38 PM IST
आसारामने भक्तांना तुरूंगातून लिहिली चिठ्ठी, दिला हा संदेश  title=

नवी दिल्ली : लैंगिक शोषण प्रकरणात तुरूंगात शिक्षा भोगत असलेला आसारामवर २५ एप्रिलला जोधपुर न्यायालय निर्णय सुनावणार आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील शाहजहापुरमध्ये राहणाऱ्या पिडितेच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. पिडितेच्या घरी ये-जा करणाऱ्यांवर नजर ठेवली जात असून घरातील मंडळी पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे पोलीस अधिक्षक दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले. निकालाची तारीख घोषित केल्यापासून घराबाहेर सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात केल्याचे एसएचओ अशोक सोलंकी यांनी सांगितले.

भक्तांना लिहिली चिठ्ठी 

लैंगिक शोषण प्रकरणी निकाल लागण्याआधी आसारामने भक्तांना एक चिठ्ठी लिहिली आहे. निकालाच्या दिवशी कोणीही जोधपूरला येऊ नका, त्याच्या सुटण्यासाठी प्रार्थना करा, कायद्याचे पालन करा. असा संदेश त्याने आपल्या भक्तांसाठी दिला आहे. जोधपूरला जाऊन आपला पैसा आणि वेळ फुकट घालवू नका, देवावर विश्वास ठेवा असेही त्याने सांगितले. 

भक्तांची प्रार्थना 

आसाराम बापू बाहेर तुरूंगातून निघावा म्हणून त्याचे भक्त देवाला प्रार्थना करत आहेत. आसाराम नक्की सुटेल असा त्यांना विश्वास आहे. 

१० दिवसांसाठी १४४ कलम 

आसारामच्या केसवर निकालादरम्यान १० दिवस कलम १४४ लागू करण्यात आले आहे. २१ ते ३० एप्रिलपर्यंत हे कलम लागू राहणार आहे. मोठ्या संख्येने क्त जमा होऊन राम रहीम प्रकरणासारख्या विध्वंस होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. 

तुरुंगात भरणार न्यायालय 

आसारामला तुरूंगातून न्यायालयात आणताना काहीतरी दगाफटका होऊ शकतो अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षा सुनावताना आसारामला तुरूंगातच ठेवावे अशी मागणी पोलिसांनी केली होती. न्यायालयाने ही मागणी स्वीकारली आहे. त्याचसोबत तुरूंगातच न्यायालय भरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.