आसाममध्ये पाच जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या विजयाची नोंद केली आहे. एनडीएच्या सर्व उमेदवारांनी पाचही विधानसभा जागांवर मोठ्या अंतराने विजय मिळवला. मात्र यातील सर्वात जास्त चर्चा एनडीएचं समर्थन असणाऱ्या उमेदवार दीप्तिमयी चौधरी यांची आहे.
बोगाईगाव मतदारसंघातून एनडीए युतीच्या उमेदवार आणि आसाम गण परिषदेच्या तिकीटावरुन मैदानात उतरलेल्या दिप्तिमोय चौधरी यांनी 'बोंगाईगाव विधानसभा सीट'वर झालेल्या पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवला. दीप्तिमयी चौधरी यांनी काँग्रेस उमेदवार ब्रजेंजीत सिंह यांचा 35 हजार 164 मतांनी पराभव केला.
दरम्यान विजयानंतर पक्षाचे समर्थक शहरात विजयी रॅली काढत होते तेव्हा दीप्तिमयी चौधरी यांचे पती आणि बरपेटा मतदारसंघातील लोकसभा खासदार फनी भूषण चौधरी भाजी विकत असल्याचं दिसलं.
झालं असं की, फनी भूषण चौधरी रस्त्यात पत्नीच्या विजयी रॅलीची वाट पाहत थांबले होते. तेव्हा तिथे एक भाजीवाला भाजी विकत होता. यानंतर खासदार भाजीवाल्याच्या जागी बसले आणि भाजी विकण्यास सुरुवात केली. खासदार भाजी विकत असल्याचं पाहिल्यानंतर तिथे एकच गर्दी झाली. खासदारांच्या या साधेपणाचं लोक कौतुक करु लागले.
एकीकडे पत्नी विजयाचा जल्लोष करत असताना, दुसरीकडे खासदार पती भाजी विकत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडत आहे. पत्नीची विजयी रॅली पोहोचल्यानंतर खासदार पतीही त्यात सहभागी झाले. फनी भूषण चौधरी आपल्या साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात. ते कधी चहाच्या टपरीवर, तर कधी स्कुटीवरुन फिरताना दिसतात.