लखनऊ: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून सोशल मीडियावर 'मै भी चौकीदार' या मोहीमेचा जोरदार प्रचार केला जात आहे. या मोहीमेच्या प्रचारासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी ट्विटर अकाऊंटवर आपल्या नावापूर्वी चौकीदार असे संबोधन लावले होते. त्यामुळे या मोहिमेची चांगलीच वातवरणनिर्मिती झाली होती. मात्र, उत्तर प्रदेशातील भाजप नेते मनोज कश्यप यांनी त्यापुढे जात थेट देवांना चौकीदार केले आहे. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हीडिओमध्ये मनोज कश्यप घोषणाबाजी करताना दिसत आहेत. 'मेरा अपना...चौकीदार, किसान का अपना.... चौकीदार, मेरा शंकर... चौकीदार, मेरा राम है... चौकीदार, मेरा हनुमान है... चौकीदार, जरा जोर से बोले... चौकीदार, अशी घोषणा कश्यप यांनी दिली. लोकांनीही या घोषणेला चांगलाच प्रतिसाद दिला. मनोज कश्यप शहाजानपूर मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत. उत्तर प्रदेशातील भाजपच्या स्टार प्रचारकांमध्येही त्यांचा समावेश आहे.
Shahjahanpur BJP leader Manoj Kashyap raises chants of Ram and Hanuman to be 'Chaukidar' at a public meeting. pic.twitter.com/SLR2gxi8cL
— Mike youth Indian (@mikeyanki2) April 5, 2019
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मैं भी चौकीदार' या मोहिमेअंतर्गत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकाचवेळी देशातील ५०० ठिकाणच्या लोकांशी संवाद साधला होता. गेल्या काही महिन्यांपासून भाजपकडून आक्रमक प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, या प्रचाराला हवी तशी धार येत नव्हती. काँग्रेसची 'चौकीदार चोर है' ही घोषणा भाजपसाठी डोकेदुखी ठरत होती. तेव्हा मोदींनी 'मै भी चौकीदार हूं' असा नारा देत काँग्रेसला शह दिल्याचे मानले जाते. सोशल मीडियावर या मोहिमेला चांगलेच यश मिळाले होते.