नवी दिल्ली : हत्ती आणि त्याच्या पिल्लाचा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हत्ती आणि त्याच्यामागे पिल्लू रस्ता पार करताना दिसत आहे. हा फोटो नीट बघितला की हत्तीच्या पिल्लाच्या मागच्या बाजूला आग लागलेली दिसत आहे.
पश्चिम बंगालमधल्या एका गावात हा फोटो काढण्यात आला आहे. या फोटोमध्ये गावकरीही दिसत आहेत. हत्तीला आगीपासून वाचवण्यासाठी गावकऱ्यांची धावपळ सुरु असल्याचं तुम्हाला फोटो पाहून वाटेल. पण याचं वास्तव मात्र धक्कायदायक आहे. हत्तीला पळवण्यासाठी गावकऱ्यांनी हत्तीच्या गळ्यात आगीचे गोळे आणि फटाके टाकले. याला घाबरून हत्ती आणि त्याचं पिल्लू तिकडून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पळत आहे.
या फोटोला सँक्च्युरी वाईल्डलाईफ फोटोग्राफी अवॉर्ड २०१७ चा पुरस्कारही मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा फोटो नावजला गेला आहे. भारतामध्ये हत्ती आणि माणसांमध्ये कसा संघर्ष सुरु आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या फोटोमधून करण्यात आला आहे. 'हेच नरक आहे' असं टायटल या फोटोला देण्यात आलं आहे.
माणूस आणि जनावरांमधल्या या संघर्षाचा फोटो भारतीय फोटोग्राफर बिपल्व हजारा यांनी काढला आहे. काही महिन्यांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये त्यांनी हा फोटो क्लिक केला आहे.