Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये आंदोलनांची ठिणगी पडली आणि पाहता पाहता या ठिणगीचा वणवा भडकला. शेजारी राष्ट्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये सुरू असणाऱ्या हिंसक आंदोलनांमध्ये जवळपास 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू ओढावला असून, हे आंदोलन तेव्हा चिघळलं जेव्हा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी पदाचा राजीनामा देत देश सोडून भारताची वाट धरली.
आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी ढाका पॅलेसपासून मुजीब यांच्या मूर्तीपर्यंत अनेक गोष्टींची तोडफोड सुरू केली. या सर्व घडामोडींचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटले असून, आता व्यवसाय क्षेत्रामध्येही या सर्व घडामोडींचा परिणाम दिसून येत आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही राष्ट्रांमध्ये आयात- निर्यातीचा व्यवहार मोठा असून, येत्या काळात यावरही आंदोलन आणि अराजकतेचे थेट परिणाम दिसून येणार ही बाब नाकारता येत नाही.
बांगलादेश आणि भारत या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या व्यवसायावर शेजारी राष्ट्रातील गोंधळाचा परिणाम मागील काही दिवसांपासूनच स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार बांगलादेशमधील अस्थिर वातावरणामुळं दर दिवशी साधारण 150 कोटी रुपयांचा व्यवसाय प्रभावित होत असून कैक व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत.
ibef.org च्या आकडेवारीनुसार बांगलादेश भारताचा मोठा ट्रेडिंग पार्टनर असून, दुसरा सर्वात मोठा एक्स्पोर्ट पार्टनर आहे. 2023-24 च्या आर्थिक वर्षामध्ये दोन्ही देशांमधील व्यवहार 14.22 अब्ज डॉलर इतका होता. या दोन्ही देशांकडून आयात निर्यात तत्त्वांवर अनेक गोष्टींची देवाणघेवाण केली जाते.
कापूस धागा (1.02 अब्ज डॉलर)
इंधन उत्पादनं (816 मिलियन डॉलर)
अन्नधान्य (556 मिलियन डॉलर)
सूती कपडे आणि इतर सामान (541 मिलियन अमेरिकी डॉलर)
कार्बनयुक्त आणि इतर रसायनं (430 मिलियन डॉलर)
RMG कपास (510 मिलियन डॉलर)
सूती कपडे, मेड अप (153 मिलियन डॉलर)
RMG मानव निर्मित फायबर (142 मिलियन डॉलर)
मसाले (125 मिलियन डॉलर)
जूट (103 मिलियन डॉलर)
मागील काही वर्षांमध्ये भारत आणि बांगलादेश या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या व्यावसायिक नात्यांमध्ये सुधारणा झाली आहे. भारतात मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर लगेचच शेख हसीना यांनी 22 जून रोजी त्यांची भेट घेतली होती, याच भेटीमध्ये अनेक करारांसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला होता. भारतीय रुपयांमधील व्यवहारासंदर्भातील करारही याच भेटीदरम्यान झाल्याचं सांगितलं जातं.