देहराडून : हैदराबादमधल्या एका रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूराचा मुलगा हिंमतीने झालाय लष्करी अधिकारी
नुकताच पार पडलेला इंडीयन मिलिटरी अकॅडमीचा दिक्षांत सोहळा काही वेगळाच होता. हैदराबादमधल्या एका सिमेंट कंपनीत 100 रुपये रोजाने काम करणाऱ्या बर्नाना गुन्नया हे आपल्या मुलाला भारताच्या लष्करी अधिकाऱ्याच्या रुपात बघत होते. आपल्या मुलाला, बर्नाना यादागिरीला या रुपात बघताना ते स्वत:चे अश्रू रोखू शकले नाहीत. बर्नाना यादागिरीने प्रतिष्ठेचं रौप्यपदकसुद्धा पटकाऊन आपली गुणवत्ता सिद्ध केलीय.
बर्नाना यादागिरीला हा हैदराबादच्याच इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीमधून सॉफ्टवेअर इंजिनियर झालेला आहे. तसच कॅटच्या परिक्षेत ९३.४ आयआयएम इंदूर इथेही त्याला प्रवेश मिळाला होता. पण त्याने मनाची साद ऐकली आणि देशसेवेसाठी लष्करात भरती व्हायचं ठरवलं.
त्याच्या या निर्णयाने त्याचे वडील अस्वस्थ झाले. बर्नाना यादागिरी म्हणतो, माझे वडील अतिशय साधे सरळ व्यक्ती आहेत. मी जेव्हा सैन्यात जायचा निर्णय घेतला तेव्हा ते म्हणाले होते की तू मोठया पगाराची सॉफ्टवेअर मधली नोकरी सोडून चूक करतो आहेस. पण मी माझ्या मनाची साद ऐकली.
बर्नाना यादागिरीने अनेक अडचणींना तोंड देत आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. घरची परीस्थिती बेताचीच. असं असूनसुद्धा कॉर्पोरेट क्षेत्रातली मोठ्या पगाराची नोकरी सोडून देशसेवेसाठी सैन्यात जाण्याचा त्याचा निर्णय हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.