Punjab CM भगवंत मान यांनी लाच मागणाऱ्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून केली हक्कालपट्टी

 पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विजय सिंगला यांची हकालपट्टी केली आहे. 

Updated: May 24, 2022, 02:02 PM IST
Punjab CM भगवंत मान यांनी लाच मागणाऱ्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून केली हक्कालपट्टी  title=

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्याच सरकारमधील मंत्री विजय सिंगला यांची हकालपट्टी केली आहे. विजय सिंगला यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही कारवाई केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाब पोलिसांना विजय सिंगला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

विजय सिंगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याची घोषणा करताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक टक्काही भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले की, लोकांनी मोठ्या अपेक्षेने आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन केले आहे. त्या अपेक्षेप्रमाणे जगणे हे आपले कर्तव्य आहे. जोपर्यंत अरविंद केजरीवाल सारखे भारतमातेचे सुपुत्र आणि भगवंत मान सारखे सैनिक आहेत, तोपर्यंत भ्रष्टाचाराविरुद्धचे महायुद्ध सुरूच राहील, असे सीएम मान म्हणाले.

भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये विजय सिंगला हे आरोग्यमंत्री होते. विजय सिंगला यांच्यावर अधिकार्‍यांकडून कंत्राटावर एक टक्का कमिशनची मागणी आणि भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी येत होत्या. विजय सिंगला यांच्या भ्रष्टाचारात गुंतल्याच्या आरोपाबाबत सबळ पुरावे मिळाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला.

ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराची व्यवस्था उखडून टाकण्याची शपथ घेतली होती. आम्ही सर्व त्यांचे सैनिक आहोत, असे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इथे एक टक्काही भ्रष्टाचाराला थारा नाही. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्याच मंत्र्याला बडतर्फ करण्याची ही कारवाई भ्रष्टाचारात गुंतलेल्या इतर नेत्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठीही कडक संदेश म्हणून पाहिली जात आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आपल्याच मंत्र्याला बडतर्फ करण्याची पंजाबमधील ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाने भ्रष्टाचारावरून सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्याची आश्वासने पक्षाने दिली होती.