ब्रिटन : ब्रिटनकडून कोरोना साथीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या संपूर्ण जगासाठी एक चांगली बातमी आली आहे. क्लिनिकल चाचणीत 'सॅनोटाइझ' कोरोनावर उपचार करण्यामध्ये यशस्वी झाला आहे. चाचणीत असे आढळले आहे की, 'सॅनोटाइझ' वापरणार्या कोरोना रूग्णांमध्ये विषाणूचा परिणाम 24 तासांत 95 टक्क्यांनी आणि 72 तासांत 99 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा केला जात आहे. कोरोनावरील उपचारांविषयी या क्लिनिकल चाचणीमध्ये काय यश प्राप्त झाले? आणि त्याद्वारे कसे उपचार केले जातील याची माहिती घेऊ यात.
ही क्लिनिकल चाचणी बायोटेक कंपनी 'सॅनोटाइझ' रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (SaNOtize) आणि ब्रिटनच्या एशफोर्ड ऍन्ड पीटर्स हॉस्पिटल्सने केली आहे. या क्लिनिकल चाचणीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे.
या क्लिनिकल चाचणीच्या निकालामुळे असे सिद्ध होत आहे की, 'सॅनोटाइझ', जे एक नायट्रिक ऑक्साइड नोझल स्प्रे (एनओएनएस) आहे, ते एक सुरक्षित आणि प्रभावी ऍन्टी-व्हायरस उपचार आहेत. हा नोझल स्प्रे कोविड -19 विषाणूचा संसर्ग रोखू शकतो आणि त्याचा कालावधीही कमी करू शकतो. इतकेच नाही तर यामुळे विषाणूची तीव्रता कमी होऊ शकते आणि ज्यांना आधीच संक्रमण झाले आहे, त्यांचे नुकसान कमी होऊ शकते.
चाचणी दरम्यान 79 कोरोना संक्रमित रुग्णांवर सॅनोटाइझच्या प्रभावाचा अभ्यास केला गेला. नोझल स्प्रेच्या वापरामुळे कोरोनाच्या रूग्णांमधील सॉर्स-कोव्ह -2 विषाणूच्या नोंदीचा भार कमी झाला. पहिल्या 24 तासांत व्हायरसची सरासरी घट 1.362 झाली. अशाप्रकारे, 24 तासांनंतर व्हायरस सुमारे 95 टक्के कमी झाला आणि 72 तासांत व्हायरसमध्ये 99 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे.
चाचणीत सहभाग घेतलेल्या बहुतेक रूग्णांना कोरोनातील यूके व्हेरिएंटची लागण झाली. या कोरोनाचा प्रभाव प्राणघातक मानला जातो. या चाचणी दरम्यान रुग्णांवर कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत, असे रिसर्चच्या निकालांमध्ये नमूद केले आहे