समस्तीपूर : राष्ट्रीय जनता दलाचे नेते रघुवर राय यांची गुरूवारी सकाळी घराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली. ते आपल्या घरातून मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. रघुवर राय यांना दरभंगा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रघुवर राय हे समस्तीपूरच्या कल्याणपूर ठाण्याअंतर्गत राहत होते. ते पूर्व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देखील होते. गुरूवारी पहाटे ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक ला निघाले. सुर्योदय होत होता आणि रस्त्यावर कोणीच नव्हते. आपल्या घरापासून ते काही अंतरावर पोहोचले इतक्यातच बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी राय यांच्यावर फायरिंग केले. काही वेळातच ते जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
गोळ्यांचा आवाज ऐकून आजुबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची गंभीर अवस्था पाहता डॉक्टरांनी त्यांना हायर सेंटरला नेण्याचा सल्ला दिला. दरभंगा येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले. पण उपचारांच्या काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आरजेडी नेत्याची हत्या झाल्याचे कळताच त्यांचे समर्थक, कार्यकर्त्यांनी हॉस्पीटल आणि त्यांच्या घरी गर्दी केली. अनेकांनी महामार्ग रोखून धरला आणि आंदोलन केले.
याप्रकरणी तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर हल्ला चढवला आहे. नितीश कुमारजींनी सत्तेत संरक्षण दिलेल्या गुंडांना संभाळावे असा टोला तेजस्वी यांनी लगावला. तुम्ही संरक्षण दिलेले गुंडे आरजेडी आणि आरएलएसपी नेत्यांना मारत आहेत. तुम्ही आतापर्यंत यावर तोंड उघडले नाही. हे खूप निंदनीय असल्याचे ते म्हणाले. तुम्ही गृहमंत्रीपदी का आहात ? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.