नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपशी दोन हात करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्व तयारी केली आहे. भाजपला तगडी टक्कर देण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब करण्याचे त्यांनी ठरवले असल्याचे दिसते. दोन दिवसांपूर्वी बहिण प्रियंका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता भाजपच्या हिंदूत्वाच्या मुद्द्याला टक्कर देण्यासाठी राहुल गांधी कुंभमेळ्यामध्ये जानवं घालून गंगास्नान करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा पद्धतीने जानवं घालून गांधी कुटुंबातील एखादी व्यक्ती कुंभमेळ्यात गंगास्नान करते आहे, हे दृश्य पहिल्यांदाच बघायला मिळू शकते.
लोकसभेची निवडणूक राहुल गांधी यांच्यासाठी मोठी परीक्षा आहे. त्यामुळे प्रचारासाठी आणि सत्ताधारी भाजपवर टीका करण्यासाठी कोणताही मुद्दा ते सोडत नाही. सध्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. यासाठी अनेक भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. याच संधीचा फायदा उठविण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतल्याचे सूत्रांकडून समजते. 'झी न्यूज'ला मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी फेब्रुवारीमध्ये धोतर नेसून आणि उपरणं घालून गंगास्नान करणार आहेत. यावेळी राहुल यांच्यासोबत १२ पंडीतही असणार असून, ते मंत्रपठण करणार आहेत. गंगा किनाऱ्यावरील लाखो भाविकांसमोर हे सर्व घडणार आहे.
उत्तर प्रदेशात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राहुल गांधी राज्यात १२ जाहीर सभा घेणार आहेत. या सभांमध्ये प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत असणार आहे. प्रियंका गांधी यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या पुढील काही महिने लखनऊमध्ये तळ ठोकून राहणार आहेत, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.
२०१७ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांचा ब्राह्मण असण्याचा मुद्दा पुढे आला होता. काँग्रेस नेते रणदीप सुर्जेवाला यांनी तो उपस्थित केला होता. त्यानंतर राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी पुष्करमध्ये त्यांचे गोत्र कोणतेही हे सुद्धा सांगितले होते. आता कुंभमेळ्यात गंगास्नान करून ते आपले हिंदूत्वाचे कार्ड आणखी नेमकेपणाने वापरतील, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.