'2 मर्सिडीज दिल्यावर शिवसेनेत..', गोऱ्हेंच्या विधानावरुन राऊतांची थेट पवारांवर टीका; म्हणाले, 'तुम्ही गप्प..'

Neelam Gorhe Controversial Comment: संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली असून थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 24, 2025, 12:04 PM IST
'2 मर्सिडीज दिल्यावर शिवसेनेत..', गोऱ्हेंच्या विधानावरुन राऊतांची थेट पवारांवर टीका; म्हणाले, 'तुम्ही गप्प..'
राऊतांचा थेट हल्लाबोल

Neelam Gorhe Controversial Comment: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी निलम गोऱ्हेंवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. 2 मर्सिडिज गाड्या दिल्यावर शिवसेनेमध्ये एक पद मिळायचं असं विधान निलम गोऱ्हेंनी केल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. दिल्लीत सुरु असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' हा कार्यक्रमील मुलाखतीत बोलताना गोऱ्हेंनी केलेल्या विधानावरुन राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावरुन राऊतांनी थेट राष्ट्रवादीचे संस्थापक आणि 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. 

विश्वासघातकी बाई

मराठी साहित्य संम्मेलनाच्या मंचावरुन निलम गोऱ्हेंनी हे विधान केल्याच्या मुद्द्यावरुन भाष्य करताना संजय राऊतांनी संतापून, "खंडण्या घेवून साहित्य संमेलन भरवतात. निलम गो-हे यांचे वक्तव्य म्हणजे विकृती आहे. मला आठवत बाळासाहेब म्हणाले होते की हो कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? डीपी होत असताना कुणाकुणाच्या नावावर कोट्यवधी रूपये घेतले. नाशिकचे विनायक पांडे यांनी उमेदवारी देताना या बाईंनी पैसे घेतले होते. लायकी नसताना पद दिली," अशा शब्दांमध्ये आगपाखड केली. "साहित्य महामंडळाने माफी मागायला हवी. 100 टक्के हक्कभंग आणा. मी नीलम गो-हे या व्यक्तीविरोधात बोललो आहे. विश्वासघातकी बाई आहे," असंही राऊत म्हणाले. 

पवारांना जबाबदारी झटकता येणार नाही

नीलम गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊतांनी, "लक्षवेधी लावायला किती प्रश्न घेतात ते विचारा. प्रश्न विचारायला त्या किती पैसे घेतात ते विचार," असं म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना राऊतांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे. "जी राजकीय चिखलफेक झाली त्याला शरद पवारही तितकेच जबाबदार आहेत. तुम्ही गप्प कसे राहू शकतात? तुमच्यावर चिखलफेक झाल्यावर आम्ही बोलतो ना," असं म्हणत संजय राऊतांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधल्याचं दिसून आलं आहे. तसेच, "साहित्य महामंडळ भ्रष्ट संस्था आहे. पैसे घेवून कार्यक्रम लावतात. शरद पवारांना ही जबाबदारी झटकता येणार नाही. तुम्ही स्वागताध्यक्ष आहात. त्यांनी तर याचा निषेध व्यक्त केला पाहिजे," अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली. 

खंडण्या देऊन साहित्य संमेलन

"साहित्य संमेलन आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्य, मराठी भाषा, मराठी माणूस यावर चर्चा व्हायला हवी. तिथे राजकीय चिखलफेक होत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी देशाच्या राजधानीत संमेलन भरवलं का? साहित्य महामंडळ आहे. ज्यांच्याकडे खंडण्या देऊन साहित्य संमेलन भरवतात. सरकारने दोन कोटी दिले की त्यातले 25 लाख काढून घ्यायचे, खंडणी म्हणून आणि संमेलन भरवायला परवानगी देण्याचे काम करतात. कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक असतात हे सतरंज्या उचलायला असतात. उषा तांबे यांनी ठरवलं…ज्यांचे पतीराज महाराष्ट्राचे पीडब्ल्यूडी सेक्रेटरी होते. सगळ्यात भ्रष्ट खाते आहे. हे मराठी भाषेवर कार्यक्रम ठरवणार," असा टोमणा राऊतांनी मारला.

कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले

"नीलम गोरहे यांचे कालचे जे वक्तव्य आहे ते त्यांची विकृती आहे ज्या घरात तुम्ही खाल्लं चार वेळा आमदार झालात त्यावरच बोलताय. चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटात घाण करून गेल्या. या बाईंचे कर्तुत्व काय हे जर समजून घ्यायचे असेल तर पुण्यात महानगर पालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून त्यांची मुलाखत घ्या जाऊन. त्यांच्याकडून धमक्या देऊन जेव्हा पुण्याचे प्लॅनिंग डीपी सुरू होते तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले हे विचारा मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे हे कळेल," असा टोला राऊतांनी लगावला.

विनायक पांडे, अशोक हरनाळ यांची मुलाखत घ्या

"आमचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंना उमेदवारी देण्यासाठी या बाईंनी किती पैसे घेतले होते हे त्यांनाच विचारा. विनायक पांडे यांना विचारा. मी रेकॉर्डवर सांगतोय. ते प्रकरण काय आहे ते आम्हाला माहिती आहे. विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले या बाईकडूननंतर. विनायक पांडे, अशोक हरनाळ यांची मुलाखत घ्या. अजून तुम्हाला नावे देईन," असंही राऊत म्हणाले. 

तुम्ही कोणावर थुंकताय?

"तुम्ही कोणावर थुंकताय? 'मातोश्री'वर? तुमची लायकी नसताना चार वेळा आमदार केले काय कर्तुत्व होत? बाळासाहेब यांनी तुम्हाला आमदार केले नाही. अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाहीत," असं म्हणत राऊतांनी निलम गोऱ्हेंवर निशाणा साधला.