CIDCO Lottery 2025 : मुंबईमागोमागच नवी मुंबईचंही (Navi Mumbai) महत्त्वं मोठ्या प्रमाणात वाढलं आणि नवनवीन सुविधांसह हीच नवी मुंबईसुद्धा आता महामुंबई होण्याच्याच दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वीची नवी मुंबई आणि आताची नवी मुंबई पाहिल्यास हा फरक लगेचच जाणवतो. नवनवीन गृहप्रकल्प, नवनवीनच विकासकांचा इथं असणारा ओघ पाहता यात सिडकोसुद्धा मागे राहिली नाही. किंबहुना नवी मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यात सिडकोनं महत्त्वाची भूमिका बजावली. सामान्यांना इथं वास्तव्यासाठी सदनिकांची निर्मिती केली.
गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या याच सिडकोला सध्या मात्र काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण, नेहमी चांगला प्रतिसाद मिळणाऱ्या सिडकोच्या सध्याच्या सोडतीकडे मात्र घर घेण्यासाठीची इच्छा असतानाही अनेकांनीच पाठ फिरवली आहे.
रेल्वे स्थानक, भाजी मंडई, मॉल, सुटसुटीत वस्ती असं सारंकाही असतानाही सर्वाधिक पसंती असणाऱ्या वाशीतील घरांना मात्र आता प्राधान्य मिळताना दिसत नाहीय. घरांचा लहान झालेला आकार आणि वाढलेल्या भरमसाट किमती या कारणांमुळळे नवी मुंबईत घर घेण्यासाठी नागरिकांची सर्वाधिक पसंती वाशीला असतानाही सिडकोला मात्र वाशीच्या प्रकल्पातील घरांच्या विक्रीत यश लाभलेलं नाही. वाशी ट्रक टर्मिनलच्या जागेवर सिडकोनं 3139 घरांची निर्मिती सुरू केली. पण, नुकत्याच काढलेल्या सोडतीतून यापैरी 2651 घरंच अर्जदारांना देण्यात आली. वाशीत पहिल्या फेरीत घरं मिळणाऱ्यांचा आकडा 1740 असून, आता यामधून कितीदण घर घेतात हासुद्धा एक प्रश्नच आहे.
प्रत्यक्षात राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिडकोच नव्हे तर, राज्य शासनाच्या वतीने मोठा गाजावाजा करत नवी मुंबईत 26 हजार घरांची योजना जाहीर करण्यात आली होती. इतकंच काय तर घरांच्या किमती 10 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणासुद्धा त्यावेळी करण्यात आली होती. पण, निवडणूक झाली, महायुती सत्तेतही आली मात्र घरांच्या किमती कमी झाल्या नाहीतच. उलटपक्षी किमती इतक्या वाढल्या की इच्छा असतानाही या सोडत प्रक्रियेतून अनेकांनीच काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं.