Champions Trophy IND vs PAK: विजयी सलामी दिल्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला दुबईच्या मैदानावर धूळ चारली. रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पाकिस्ताननं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्मय घेतला आणि भारतापुढे 242 धावांचं लक्ष्य ठेवलं. सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानला कशाबशा 241 धावा करण्यात यश मिळालं.
भारतीय गोलंदाजांपैकी कुलदीप यादवने सर्वाधिक 3 तर हार्दिक पांड्याने 2 गडी बाद केले. पाकिस्तानचं हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून दिली. ज्यानंतर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयश अय्यर यांनी संयमी खेळ करत भारताचा विजय सुकर केला. श्रेयस 56 रन्स काढून आऊट झाला मात्र विराटनं साजेशी खेळी करत 51 वं शतक पूर्ण केलं आणि त्याचा हाच खेळ निर्णायक ठरलाय, ज्यामुळं भारताने सेमीफायनलमध्ये धडक मारली आणि पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं.
विराटनं 11 चेंडूंमध्ये ही शतकी खेळी केली आणि त्याच्या या यशानंतर आधीचा विराट आणि आताचा विराट यांच्यामध्ये असणारा फरक क्रिकेटप्रेमींना भारावून गेला. सुरुवातीच्या वर्षांमध्ये क्रिकेटच्या मैदाना अतिशय आवेगानं येणारा विराट जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आणखी शांत आणि संयमी खेळीचं प्रदर्शन करताना दिसला. यावेळीसुद्धा पाकिस्तानसोबतच्या सामन्यानंतर त्यानं दिलेली प्रतिक्रिया पाहता विराटच्या या यशामध्ये अध्यात्मिक जीवनाचा प्रभाव आणि त्याचे अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांचे आशीर्वादही दिसून आल्याचं म्हटलं गेलं.
'प्रामाणिकपणे सांगावं तर इतक्या महत्त्वाच्या सामान्यात संघाला पात्रता फेरीत प्रवेश मिळवून देण्यासाठी खेळता येणं हे पाहून छान वाटतं', असं म्हणत आपण मागच्या सामन्यातून काय शिकलो हे पाहणं महत्त्वाचं असल्याची बाब त्यानं अधोरेखित केली.
'मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलं असता फिरकी गोलंदाजांचा कोणताही धोका न पत्करता सामना करणं हेच माझं लक्ष्य होतं. अखेरच्या काही षटकांमध्ये श्रेयसनं धावांचा वेग केला आणि मलाही काही चौकार मारता आले, जिथं मला माझा नेहमीचा खेळ खेळता आला. मला माझ्या खेळाविषयी काही ज्ञान आहे. हे ज्ञान म्हणजे इतर काहीही ऐकू न येता हा आवाजच दूर ठेवणं, स्वत:च्या वलयात राहणं आणि माझ्या मनाच्या ताकदीची काळजी घेत त्या सकारात्मक विचारांमध्ये वावरणं. अपेक्षांचं ओझं सहज पेलवता येतं. माझं काम असतं ते म्हणजे वर्तमानात राहत संघासाठी कामगिरी करावी. माझं स्वत:ला इतकंच सांगणं असतं की, मला माझी 100 टक्के कामगिरी करायची आहे आणि मग देव योगायोगानं तुम्हाला साथ देतोच.'
आपल्या जीवनात कोणत्याही गोष्टीची स्पष्टोक्ती महत्त्वाची असून, त्या ठिकाणी वेगवान चेंडू येईल तेव्हातेव्हा धावा काढणं गरजेचं होतं. अन्यथा फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व मिळवलं असतं असंही विराटनं सांगितलं. वयाच्या 36 व्या वर्षी हे सर्वकाही करणं छान वाटतं असं म्हणताना त्यानं आपल्या या प्रयत्नांसाठी तितकीच मेहनतही लागल्याचं म्हटलं.