130000000000 रुपयांचा ऑनलाईन दरोडा; लोकांना कॉम्प्युटर चालवता येईना त्या देशातला आरोपी

Crypto Heist Shocking News : सर्वात मोठी फिल्मी चोरी; आकड्यांचा नुसता खेळ... हॅकरनं घातला तब्बल 130000000000 कोटींचा गंडा 

सायली पाटील | Updated: Feb 24, 2025, 12:12 PM IST
130000000000 रुपयांचा ऑनलाईन दरोडा; लोकांना कॉम्प्युटर चालवता येईना त्या देशातला आरोपी
Business News Bybit cypto hack hackers stole Ethereum worth rupees 13000 in Indian currency

Crypto Heist Shocking News : डिजिटल स्वरुपातील गुंतवणुकीचा ट्रेंड संपूर्ण जगभरात पाहायला मिळत असून, गुंतवणुकीचा आणखी एक पर्याय म्हणजे क्रिप्टो करन्सी. जगभरातील अनेक गुंतवणुकदारांनी आतापर्यंत क्रिप्टो करन्सीध्ये गुंतवणूक केली आहे. असं असलं तरीही हा गुंतवणुकीचा सर्वतोपरी सुरक्षित पर्याय नाही हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. एका हादरवणाऱ्या घोटाळ्यामुळं ही बाब समोर आली असून, यामुळं पुन्हा एकदा गुंतवणुकदारांच्या पैशांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहे. 

नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार दुबईच्या क्रिप्टोकरेंसी एक्सचेंज बायबिटचा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या क्रिप्टो हॅकचा सामना करावा लागला आहे. 'ब्लूमबर्ग'च्या वृत्तानुसार आर्थिक व्यवहारांदरम्यान सुरक्षिततेतील काही खाचखळग्यांच्या मदतीनं हॅकरनं 400,000 इथेरियम चोरले. ज्यांची किंमत साधारण 1.5 बिलियन डॉलर अर्थात 13000 कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येतं. 

गुंतवणूकदार तोट्यात?  

ही इतिहासातील आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या क्रिप्टो चोऱ्यांपैकी एक मानली जात असून बिटकॉइननंतर इवेरियम हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं महागडं डिजिटल चलन ग्राह्य धरलं जातं. मागच्याच वर्षी जुलै महिन्यात भारतातील क्रिप्टो एक्सचेंज वझिरएक्सवरही मोठा सायबर हल्ला झाला होता. जिथंही 2000 कोटींचं नुकसान झालं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या देशात सामान्यांच्या  इंटरनेट वापरावर बंदी असतानाही आणि जिथं घरात साधा संगणक खरेदी करायची असेल तरीही सरकारची परवानगी घ्यावी लागते अशा उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी बी चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

हॅकर उत्तर कोरियाच्या सरकारी हॅकिंग ग्रुप लाजरसशी संबंधित असल्याचं निदर्शनास आलं असून, हा ग्रुप क्रिप्टो इंडस्ट्रीमधून अब्जावधी डॉलर्स चोरीसाठी कुप्रसिद्ध असल्याचंही म्हटलं जातं. दरम्यान, या घोटाळ्याचा फटका आपल्याला बसणार का, हाच प्रश्न गुंतवणुकदारांच्या मनात घर करत असताना Bybit चे सीईओ आणि संस्थापक बेन बेन झोउ यांनी मात्र गुंतवणुकदारांना दिलासा देत या पैशांच्या मोबदल्यात Refund देण्यास कंपनीनं सुरुवात केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

हेसुद्धा वाचा : रेल्वेस्थानक, भाजीमंडई... सारंकाही जवळ असूनही CIDCO च्या वाशीतील घरांना नापसंती; खरी कारणं माहितीयेत? 

बायबिटकडे गुंतवणुकदारांची 20 बिलियन डॉलर इतकी संपत्ती असून, जगभरात एकूण 60 मिलियनहून अधिक युजर्स आहेत. त्यामुळं चोरीला गेलेली मोठी रक्कम परत मिळणार नसली तरीही कंपनीची आर्थिक स्थिती डगमगलेली नाही हेसुद्धा त्यांनी स्पष्ट करत Bybit दिवाळखोरीकच्या दिशेनं जात नसून आपण नुकसानभरपाई देण्यास समर्थ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोठी रक्कम, आकडेवारी आणि कोणाला सुगावाही लागू न देता घातलेला गंडा यामुळं सध्या हे प्रकरण प्रचंड गाजत असून जागतिक स्तरावर या उलाढालीचीच चर्चा पाहायला मिळत आहे.