बापरे! दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या विमानाला एकाएकी इटलीच्या फायटर जेटचा वेढा, भीतीदायक Video समोर

Airplane Video Viral : विमानप्रवासादरम्यान अनेकदा काही अनपेक्षित प्रसंग उभे राहतात. अशाच एका प्रवासादरम्यानचा व्हिडीओ समोर   

सायली पाटील | Updated: Feb 24, 2025, 12:45 PM IST
बापरे! दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या विमानाला एकाएकी इटलीच्या फायटर जेटचा वेढा, भीतीदायक Video समोर
American Airlines flight diverted to Rome after bomb threatening watch video

Airplane Video Viral : 2024 या वर्षाचा शेवट आणि 2025 या वर्षाची सुरुवातच काही विमान अपघातांनी झाली आणि या क्षेत्रातील घडामोडींनी साऱ्या जगाचं लक्ष वेधलं. त्यातच आता आणखी एका वृत्ताची भर पडली असून संपूर्ण जगाचं लक्ष या प्रसंगानं वेधलं. न्यूयॉर्कहून दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या अमेरिकन एअरलाईन्सच्या एका विमानानं अनपेक्षित प्रसंगांचा सामना केला. एकाएकी हवेत असतानाच या विमानाचा मार्ग बदलण्यात आला. 

यामागं नेमकं काय कारण होतं, ही बाबही आता समोर आली असून, उपलब्ध माहितीनुसार हे विमान रोमच्या दिशेनं पाठवण्यात आलं. विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेमुळं त्याचा प्रवासमार्ग तातडीनं बदलण्यात आला. अमेरिकन एअरलाईन्सचं फ्लाइट नंबर AA292 हे विमान न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळाहून 22 फेब्रुवारी रोजी अपेक्षित स्थानी अर्थात दिल्लीच्या दिशेनं रवाना झालं. पण, ते दिल्लीला पोहोचू शकलं नाही. 

या विमानाचा मार्ग नेमका कशा पद्धतीनं बदलण्याच आला याचीसुद्धा माहिती आणि एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रवाशांना वाहून नेणारं विमान हवेत असतानाच त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 'यूरोफाइटर' ही दोन लढाऊ विमानं वेढा घातल्याचं पाहायला मिळत आहेत. ही दोन्ही लढाऊ विमानं या प्रवासी विमानाच्या इतकी जवळ होती की, त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा भीतीनं थरकाप उडाला होता. दोन्ही बाजूंनी आपल्या विमानाला लढाऊ विमानांचा वेढा आहे ही बाब लक्षात आल्यानंतर खिडक्यांमधून बाहेर नेमकं काय सुरु आहे हेच विमानाची प्रवासी जीव मुठीत घेऊन पाहत होते. 

हेसुद्धा वाचा : 130000000000 रुपयांचा ऑनलाईन दरोडा; लोकांना कॉम्प्युटर चालवता येईना त्या देशातला आरोपी

एखाद्या चित्रपटात ज्याप्रमाणे विमानाला वेढा घालत ते पुढे नेलं जातं किंवा लष्करी विमानं एखाद्या कारवाईत ज्या प्रकारे सहभागी होतात अगदी तशीच दृश्य अमेरिकेच्या या विमान उड्डाणादरम्यान पाहायला मिळाली. घडल्या प्रकाराबद्दल अमेरिकी विमानसेवा संस्थेनं आपल्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देत विमान नेमकं कधी निघालं, याची माहिती दिली. दरम्यान, विमानाच्या उड्डाणाची स्थिती आणि त्यानंतर मार्ग बदलला जाण्यामागचं मुख्य कारण यावर मात्र कोणतंही अधिकृत उत्तर समोर आलेलं नाही. सदर विमानात 199 प्रवासी आणि 15 क्रू मेंबर असून, विमानात बॉम्बची माहिती ही केवळ अफवा असल्याची बाब आता समोर येत आहे.