कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) आणि ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल (Ola CEO Bhavish Aggarwal) यांच्यात सध्या शाब्दिक वाद रंगला आहे. त्यांच्या या वादात उद्योजक हर्ष गोयंका यांनी उडी घेतली आहे. हर्ष गोयंका यांनी या वादावर उपहासात्मकपणे भाष्य केलं आहे. 'जर मला कमी अंतरावरील प्रवास करायचा असेल, म्हणजे एका 'कमरा'मधून दुसऱ्यात जायचं असेल तर मी ओलाचा वापर करतो,' असं हर्ष गोयंका म्हणाले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी भाविश अग्रवाल यांना टॅग केलं आहे.
'रविवारीही काम करा सांगणाऱ्या OLA च्या CEO ने काल...', कुणाल कामराने सगळंच केलं उघड; पोस्ट व्हायरल
हर्ष गोयंका यांनी पोस्टमध्ये आपला ओला स्कूटवर बसलेला फोटोही शेअर केला आहे. हर्ष गोयंका यांनी कुणाल कामरा आणि भाविश अग्रवाल यांच्या वादावरुन टोला लगावल्याचं स्पष्ट दिसत आहे.
भाविश अग्रवाल यांनी कंपनीचे बिझनेस हेड विशाल चतुर्वेदी यांना टॅग करत हार्ट इमोजीसह ओला गिगाफॅक्टरीचा फोटो पोस्ट केल्यावर शाब्दिक वाद सुरु झाला. यावर व्यक्त होत कामराने पोस्ट रिपोस्ट केली आणि सेवा केंद्राबाहेर धूळ गोळा खात असलेल्या अनेक ओला स्कूटर्सचा फोटो शेअर केला. त्यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाला टॅग केलं. भारतीय ग्राहक अशा वागणुकीला पात्र आहेत का? असा सवालही त्याने केला. अग्रवाल यांनी व्यंग्यात्मकपणे कामराला इलेक्ट्रिक वाहनं दुरुस्त कऱण्यासाठी आमंत्रित केले आणि त्याला "त्याच्या अयशस्वी विनोदी कारकीर्दीपेक्षा जास्त" पैसे देण्याची ऑफर दिली.
कुणाल कामराने एक्सवरुन कंपनीवर जाहीरपणे टीका केल्यानंर दोघांमधील तणाव वाढला होता. कुणाल कामराने अपुरी सेवा केंद्रे आणि असंतुष्ट ग्राहकांना परतावा न मिळणे यावर भाष्य केलं होतं. त्यांच्या या पोस्टवरुन सीईओ भाविश अग्रवाल चांगलेच संतापले आणि उत्तर दिलं. पण यामुळे ओलाचे असमाधानी ग्राहकही आपली व्यथा मांडू लागले.
कुणाल कामरा आणि भाविश अग्रवाल यांच्यातील वादामुळे ओला ग्राहकांना मिळणारा सेवेचा विषय चर्चेत आला. विक्रीनंतरच्या संबंधित समस्या, विशेषत: परतावा आणि सर्व्हिस सेंटर्सची मुबलकता, प्रवेश या नेहमीच्या समस्या आहेत. भाविश अग्रवाल यांनी आक्रमकपणे उत्तर दिल्याने सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर दिसला.
कुणाल कामराने भाविश अग्रवाल यांनी वाद घातल्यानंतर त्यांच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत टोला लगावला. "भाविश अग्रवाल, ज्यांना रविवारी कामाचा दिवस असावा असं वाटतं ते काल आपल्याला चूक सिद्ध करण्यासाठी काम करत होते," अशी पोस्ट त्याने एक्सवर टाकली आहे.