काँग्रेसला सोडचिठ्ठी देत गौरव वल्लभ यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. दरम्यान भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली असून, अनेक मोठे खुलासे केले आहेत. काँग्रेस पक्षात गेल्या 30 वर्षांपासून एकच व्यक्ती जाहीरनामा तयार करत असून, त्याने साधी क्लासच्या मॉनिटरची निवडणूक लढलेली नाही असा खुलासा गौरव वल्लभ यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष माजी मंत्र्यांच्या पीएकडून चालवला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसंच काँग्रेस पक्षाला नव्या भारताचे मुद्दे आणि आकांक्षा समजत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
"मी जेव्हा कॉलेजात होतो तेव्हा तो प्रवक्ता म्हणून टीव्हीवर पक्षाची बाजू मांडत होता. आजही तो पक्षाचा संपर्क प्रमुख आहे. तो पीए आहे. काँग्रेस पक्ष माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पीएकडून चालवला जात आहे, ज्यांना क्लास मॉनिटरची निवडणूकही लढवलेली नाही," असा गौप्यस्फोट गौरव वल्लभ यांनी केला आहे.
नुकतंच भाजपात गेलेल्या गौरव वल्लभ यांनी काँग्रेसचे संपर्क प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. जयराम रमेश यांचा उल्लेख टाळत गौरव वल्लभ म्हणाले की, जाहीरनाम्यातील व्यक्तीच्या विचारांची ताकद आणि योग्यता असती, तर काँग्रेस लोकसभेत केवळ 52 जागांवर आली नसती.
गौरव वल्लभ पुढे म्हणाले की, "काँग्रेस नेत्याची पक्षाप्रती कोणतीही विचारधारा किंवा बांधिलकी नाही. कारण त्यांना फक्त आपली राज्यसभेची जागा वाचवायची आहे. त्या व्यक्तीने (जयराम रमेश) वर्गाच्या मॉनिटरची निवडणूकही लढलेली नाही. ते फक्त काही पत्रकारांना बोलावतात आणि बातमी प्रसिद्ध करुन घेतात".
गौरव वल्लभ यांनी यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेस उमेदवारांवरही निशाणा साधला. त्यांच्यापैकी काहींना उत्तर प्रदेश आणि बिहार ही वेगळी राज्यं आहे हेदेखील माहिती नाही. ते गोंधळून जातील. ही त्यांच्या ज्ञानाची पातळी आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
काँग्रेस पक्ष नव्या नेत्यांचे विचार समजून घेऊ या विचाराने आपण त्यांच्याशी जोडलो गेलो होतो. पण काँग्रेस नवे विचार म्हणजे अडथळा समजतं असंही ते म्हणाले. काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या समस्या समजून घेण्यात असमर्थ आहे. त्यांचा पूर्वीचा पक्ष 'नव्या भारत'च्या आकांक्षा आणि दिशानिर्देशांशी जोडण्यात अक्षम आहे अशी टीकाही त्यांनी केली.
गौरव वल्लभ यांनी 4 एप्रिल रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी पत्र लिहिलं असून पक्षाला दिशाहीन म्हटलं आहे. यात त्यांनी जात जनगणना यासारख्या कारणांचा उल्लेख केला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा गैरवापर करू शकत नाही आणि सनातनाविरोधी' घोषणा देऊ शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
"काँग्रेस पक्ष आज ज्या दिशाहीन मार्गाने पुढे जात आहे, त्यात मला काही सोयरसुतक वाटत नाही. मी सनातनविरोधी घोषणा देऊ शकत नाही. तसंच देशाच्या संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा गैरवापर करू शकत नाही. मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे," अशी पोस्ट त्यांनी एक्सवर शेअर केली.