तिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर धर्माच्या अनेक ठेकेदारांना धक्का बसलाय. या निर्णयामुळे नाराज झालेल्या मल्याळम अभिनेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यानं तर अनेकांना हादरवून सोडलंय. अभिनेता आणि भाजप समर्थक तुलसीधरन नायर (कोल्लम तुलसी) यांनी भाजपद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका मोर्च्यात हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'शबरीमला मंदिरात येणाऱ्या महिलांचे दोन तुकडे करायला हवेत' असं विधान त्यांनी केलंय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी या मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
मल्याळम अभिनेता कोल्लम तुलसी यांनी मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांचे दोन तुकडे करून त्यातील एक तुकडा दिल्लीला पाठवायला हवा तर दुसरा मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर फेकायला हवा, असं गर्दीसमोर म्हटलं.
तुलसी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर मात्र भाजपनं यातून आपले हात झटकलेत. या मोर्च्याचं नेतृत्व करणारे राज्याचे भाजप प्रमुख पीएस श्रीधरण पिल्लई यांनी 'हे तुलसी यांचे व्यक्तीगत' विचार असल्याचं सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केलाय.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर झालेल्या टीकेनंतर तुलसी यांना आपली चूक ध्यानातही आलीय. तोंडातून चुकून निघालेल्या शब्दांतून आपला कुणालाही दुखावण्याचा मानस नव्हता, असं त्यांनी म्हटलंय.