BJP On Jawan Movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (shahrukh khan) 'जवान' (Jawan) चित्रपटाची सध्या सगळ्या जगात चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जवानने दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींचा गल्ला कमावला आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने (BJP) 'जवान' चित्रपटासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे कौतुक केले आहे. तसेच भाजपाने काँग्रेसवरही (Congress) निशाणा साधला आहे. भाजपाने बुधवारी शाहरुखच्या जवान चित्रपटाचा दाखला देत काँग्रेसवर टीका केली आहे. जवानने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामीच्या 10 वर्षांच्या भ्रष्ट आणि अनैतिक राजवटीचा पर्दाफाश केला आहे, असे भाजपाने म्हटलं आहे.
जवानद्वारे भाजपाने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. भाजपाने दावा केला की हा चित्रपट काँग्रेसच्या राजवटीच्या 10 वर्षांच्या भ्रष्ट धोरणाचा पर्दाफाश करतो. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी चित्रपटाचे पोस्टर एक्सवर (आधीचे ट्वीटर) शेअर करत काँग्रेसवर टीका केली आहे. 'जवान चित्रपटाद्वारे 2004 ते 2014 या काळातील भ्रष्ट काँग्रेसच्या राजवटीचा पर्दाफाश केल्याबद्दल आपण शाहरुख खानचे आभार मानले पाहिजेत. हा चित्रपट प्रेक्षकांना यूपीए सरकारच्या काळातील 'दुःखी राजकीय भूतकाळाची आठवण करून देतो, असे भाटिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
गौरव भाटिया यांनी 2009 ते 2014 दरम्यान UPA-II च्या काळात झालेल्या सीडब्लूयजी, टूजी आणि कोल-गेटसह विविध घोटाळ्यांचा उल्लेख केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्वच्छतेचा विक्रम कायम ठेवला आहे. गेल्या साडेनऊ वर्षात एकही घोटाळा झालेला नाही. शाहरुख खान म्हणतो त्याप्रमाणे, आम्ही जवान आहोत. आम्ही हजार वेळा आमचा जीव धोक्यात घालू शकतो, पण फक्त देशासाठी, देश विकणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांसाठी नाही. हे गांधी कुटुंबाला शोभते," असे गौरव भाटिया म्हणाले.
We must thank @iamsrk for exposing the corrupt, policy paralysis ridden Congress rule from 2004 to 2014 through " #JawaanMovie, reminds all viewers of the tragic political past during the UPA government.
As he puts it, "Hum jawaan hain, apni jaan hazaar baar daon par laga… pic.twitter.com/9TNH6sE2RJ
— Gaurav Bhatia गौरव भाटिया (@gauravbhatiabjp) September 13, 2023
काँग्रेसवर साधला निशाणा
"काँग्रेसच्या काळात 1.6 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर एनडीए सरकारने किमान आधारभूत किंमत लागू केली. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2.55 लाख कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. काँग्रेस सरकारने कर्ज न फेडणाऱ्या मित्रांना कर्ज दिले. पूर्वीचे कर्ज न फेडता पुढचे कर्ज दिल्याबद्दल फरारी विजय मल्ल्याने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आभार मानले होते," असे गौरव भाटिया यांनी म्हटलं आहे. धन्यवाद, शाहरुख खान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असे प्रश्न आता भूतकाळात गेले आहेत, असेही भाटिया म्हणाले.