नवी दिल्ली : Coronavirus कोरोनाशी लढताना आज देशात अमुक एक गोष्ट घडली, इतक्यांना याची लागण झाली वगैरे बातम्यांमध्येच कोरोनाशी लढणाऱ्या पोलीस यंत्रणांचे सर्वच स्तरांतून आभार मानण्यात येत आहेत अशा बातम्याही सध्या पाहायला मिळत आहेत. आपल्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या विविध तुकड्यांमध्ये सेवेत रुजू असणाऱी कित्येक मंडळी या थैमान घालणाऱ्या विषाणूशी दोन हात करत आहेत.
'फ्रंट लाईन वॉरियर्स' म्हणून उल्लेख होत असणारे हेच पोलीस कर्मचारी त्यांच्या कामाने आता थेट लष्कराचीही दाद मिळवत आहेत. ज्येष्ठ आणि विविध विषयांवर आपली परखड मतं मांडणाऱ्या अभिनेता अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये याचाच प्रत्यय येत आहे.
रस्त्यावरुन वाहन जात असतना रस्त्यालगतच काही पोलीस आणि होमगार्ड कर्मचारी दिसताच या सैन्यदल अधिकाऱ्यांनी वाहन थांबवत सेवेत तत्पर असणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. त्यांच्या कामाचं कौतुक केलं. इतकंच नव्हे, तर संपूर्ण भारतीय लक्षकाराही तुमच्या कामाचा प्रचंड अभिमान असल्याची भावना व्यक्त करत त्यांना एक लहानशी भेटही दिली.
वाचा : '...तर मराठी चित्रपटांनाच याचा फायदा होईल'
कोरोना व्हायरचा झपाट्याने फोफावणारा संसर्ग पाहता या काळातही मोठ्या धाडसाने सेवेत रुजू असणाऱ्या या सर्व मंडळींसाठी थेट लष्कराकडूनच खास भेट देत अधिकाऱ्यांनी त्यांची पाठ थोपटली. देशाच्या संररक्षणासाठी दोन वेगवेगळ्या संकल्पना आणि वेगवेगळ्या मार्गांनी तत्पर असणाऱ्या या मंडळीचा व्हिडिओ पाहता 'कंधों से मिलते है कंधे' हेच गाणं आठवतं, नाही का?