Bride of Tamil Nadu Banner Of CM Goes Viral: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील वातावरण चांगलेच तापू लागले आहेत. राजकीय पक्षांच्या बैठकी, जागावाटपासंदर्भातील बातम्या समोर येत आहेत. असं असतानाच राजकीय कार्यकर्तेही आपल्या नेत्यांच्या प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. मात्र अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे अनेकदा त्यांच्या नेत्याची फिजिती झाल्याचे प्रकार घडले आहेत. असाच प्रकार आता तामिळनाडूमध्ये घडला आहे. तामिळनाडू सरकारच्या समर्थनार्थ वातावरणनिर्मिती करण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांची फजेती झाली आहे.
इस्रोच्या पोस्टरवर चीनचे रॉकेट लावल्याने यापूर्वीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन ट्रोल झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा स्टॅलिन समर्थकांनी त्यांना तोंडावर पाडलं आहे. यंदा स्टॅलिन यांचा मोठा हार घातलेल्या बॅनरवर 'प्राइड ऑफ तामिळनाडू'ऐवजी 'ब्राइड ऑफ तामिळनाडू' असे शब्द लिहिण्यात आले आहेत. सोशल मीडियावर हे बॅनर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तामिळनाडूचा अभिमान अस उपमा मुख्यमंत्र्यांना देण्याऐवजी तामिळनाडूच्या नववधू अशी चुकीची उपमा या बॅनरमधून देण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांची खिल्ली त्यांच्याच समर्थकांनी उडवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
आता तामिळनाडूमधील सरकारच्या कामांचा उदोउदो करताना समर्थकांनी स्टॅलिन यांच्या हार घातलेल्या फोटोमागे 'ब्राइड ऑफ तामिळनाडू' म्हणजेच तामिळनाडूची नववधू असा मजकूर छापण्यात आल्याने खिल्ली उडवली जात आहे. या जाहिरातीवर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्यात. ग्रूम म्हणजेच नवरदेव कुठे आहे असा प्रश्न ट्रोलर्सने विचारला आहे. तर अन्य एकाने असे समर्थक असतील तर विरोधकांची गरजच काय असं म्हटलं आहे. एकाने हे असले बॅनर लावणाऱ्याचं आता काही खरं दिसत नाही, असं म्हणत बॅनरबाजी करणाऱ्यांबद्दलच चिंता व्यक्त केली आहे.
"Bride of Tamil Nadu" pic.twitter.com/6HunaWC3Lw
— Facts (@BefittingFacts) March 4, 2024
29 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तामिळनाडूतील इस्रोच्या प्रकल्पाचं भूमिपूजन पार पडला. त्यानिमित्त राज्य सरकारने अनेक वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातींमध्ये पंतप्रधानांच्या मागे दाखवण्यात आलेल्या रॉकेटवर चिनी राष्ट्रध्वज दिसत होता. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर स्टॅलिन सरकारला अनेकांनी ट्रोल केलं. पंतप्रधान मोदींनीही या कॉपी पेस्ट जाहिरातीची दखल घेत टोला लगावला होता. तामिळनाडू सरकारच्या जाहिरातीत चिनी रॉकेट वापरण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन मोदींनी काहीच काम न करता केवळ श्रेयवादाचा काम स्टॅलिन सरकार करत आहे. चिनी रॉकेटचे फोटो छापून त्याचेही श्रेय त्यांनी घेतलं, असा टोला मोदींनी लगावला होता.