Brother Killed Sister: उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या हिंदू प्रियकराशीच आपल्याला लग्न करायचं आहे असा हट्ट करणाऱ्या तरुणीवर तिचे कुटुंबीय प्रचंड संतापले. संतापालेल्या भावांनी रागाच्याभरात या तरुणीची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. आपल्या बहिणीची निघ्रृणपणे हत्या केल्यानंतर भावांनीच तिचा मृतदेह नाल्यामध्ये फेकून दिला. ही घटना मुरादनगरमध्ये घडली आहे.
पोलिसांनी हत्येत सहभागी झालेल्या दोन्ही आरोपी भावांना अटक केली आहे. या तरुणीचा मृतदेह शोधण्याचं काम पोलिसांनी हाती घेतलं आहे. यासाठी एनडीआरएफच्या एका टीमकडे शोध मोहिमेचं काम सोपवण्यात आलं आहे. हा संपूर्ण प्रकार शनिवारी म्हणजेच 16 डिसेंबर 2023 रोजी घडला. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या कारला नाल्याजवळ 2 तरुण संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळून आले. या दोघांजवळ जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता दोघांनीही अगदी अभिमानाने सांगावं त्याप्रमाणे आम्ही आमच्या बहिणीची हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. बहिणीची हत्या करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत, असं या दोघांनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनाही धक्काच बसला.
पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि एनडीआरएफला मृतदेहासंदर्भातील माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एनडीआरएफकडून मृतदेहाचे अवशेषांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. आमच्या बहिणीचं एका हिंदू मुलावर प्रेम होतं. तिला त्याच्याबरोबरच लग्न करायचं होतं. मात्र घरी याबद्दल समजलं तेव्हा आम्ही तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही तिने त्याच मुलाबरोबर लग्न करण्याचा हट्ट कायम ठेवत घरातल्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे कुटुंबात प्रचंड ताणतणाव आणि वाद निर्माण झाला. त्यामुळेच आम्ही तिची हत्या केल्याचा कबुली जबाब या दोघांनी पोलिसांकडे नोंदवला आहे.
आरोपींची नावं सुफियान आणि महताब अशी आहेत. दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मृत मुलीचे सॅण्डल, कपडे, आधार कार्ड, ओढणी नाल्याजवळच्या परिसरातून ताब्यात घेतले आहेत. या गोष्टी पुरावा म्हणून वापरल्या जाणार आहेत. मात्र अद्याप मृतदेह पोलिसांना सापडलेला नसल्याने त्याचा शोध सुरु असून सध्या दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेलं आहे. पुढील तपास उत्तर प्रदेश पोलीस करत आहेत.