Interim Budget 2024 Free Live Streaming : देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा ठरवण्यासाठी सरकारकडून महत्त्वाची पाऊलं उचलली जातात. यंदाच्या वर्षात केंद्र सरकार देशाला कोणत्या आर्थिक स्तरावर घेऊन जाईल? याचं उत्तर सर्वांना बजेटमधून (Budget 2024) म्हणजेच अर्थसंकल्पामधून मिळतं. अशातच आता येत्या 1 फेब्रुवारी रोजी म्हणजेच आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मसाठी अंतरिम बजेट सादर करणार आहेत. मोदी सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने कोणते मोठे निर्णय घेतले जाणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय.
एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर नवीन स्थापन झालेलं सरकार 2024-25 या आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. त्यापूर्वी आता आगामी तीन महिन्यांसाठी अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होईल का? गोरगरिबांना कोणतं गिफ्ट सरकार देणार? मध्यमवर्गींचा खिशा जड होणार की रिकामा? यावर सध्या सर्वांचं लक्ष आहे.
कधी आणि कुठे पाहाल बजेट? (Budget 2024 Live Streaming)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प 2024 लोकसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून सादर होईल. उद्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 9 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. तुम्ही 'झी 24 तास'वर (Zee 24 Taas) थेट प्रक्षेपण पाहू शकता. गुरूवारी सकाळी 11 वाजता अर्थमंत्री बजेट सादर करण्यासाठी उभ्या राहतील.
साल 1999 पूर्वी अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात होता. मात्र, इंग्रजांच्या काळातील पद्धत बदलून सकाळी 11 वाजता सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 2017 साली तारखेत बदल करण्यात आला. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2017 मध्ये पहिल्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. तेव्हापासून दरवर्षी 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता बजेट सादर केलं जातं.
सरकार कोणतं गिफ्ट देणार?
दरम्यान, हिंदू कॉलेजमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा संदर्भ देत स्पष्ट संकेत दिले होते. "जात, धर्म किंवा समुदायाचा भेदभाव न करता लोकांच्या विकासावर भर दिला जाईल, असं मोदी म्हणाले होते. युवक, महिला, शेतकरी आणि गरिबांच्या विकासाबाबत त्यांनी भूमिका मांडली होती, त्यामुळे सरकारचे लक्ष युवक, महिला, आम्हाला अन्न सुरक्षा देणारे, आमचे शेतकरी आणि गरीब यांच्या विकासावर असेल", असं निर्मला सीतारामण यांनी म्हटलं होतं.