मुंबई : जीएसटी लागू झाल्यामुळे कार आणि बाईकच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे. मारुती, टाटा, टोयोटा, हिरो, हुंदई, मर्सिडीज या कंपन्यांनी कार आणि बाईकचे दर कमी केले आहेत. जीएसटीआधी प्रत्येक राज्यामध्ये व्हॅटच्या दरानुसार किंमती या वेगवेगळ्या होत्या पण आता एकच कर असल्यामुळे किंमतीही कमी झाल्या आहेत.
मारुतीनं कारच्या किंमती ३ टक्क्यांनी कमी केल्या आहेत. मारुती सुजुकी ऑल्टो ८००ची किंमत ७,५०० रुपयांनी कमी झाली आहे. मारुती स्विफ्ट १८ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. स्विफ्ट डिझायरसाठी २० हजार रुपये कमी द्यावे लागणार आहेत.
हुंदई क्रेटा ४० ते ६० हजारांनी स्वस्त झाली आहे. टोयोटा इनोव्हा बेस मॉडेल १४.२ लाखांऐवजी १३.३ लाखांना मिळणार आहे. मर्सिडीज ई-क्लासची किंमत २ लाखांनी कमी करण्यात आली आहे.
तर टाटानं जॅग्वार लँड रोव्हरनं कारच्या किंमती ७ टक्क्यांनी कमी केल्यात. जॅग्वार कंपनीच्या गाड्यांची किंमत २.६ लाख ते ३ लाख रुपयांनी कमी झाली आहे. सिडान कारची किंमत ८.६ टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. जीएसटी लागू झाल्यामुळे बाईकच्या किंमती २ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. हिरो मोटोकॉर्पच्या बाईक ४०० ते १८०० रुपयांनी स्वस्त झाल्यात.