मुंबई : Vehicle penalty : वाहतूक नियमांचे उल्लंघन आता तु्म्हाला चांगलेच महागात पडणार आहे. नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची (Motor Vehicle Act) अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जर नियमांचं उल्लंघन केल्यास दंड भरावा लागणार आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसविण्यासाठी नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे. या कायद्यानुसार वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना एक हजार रुपये दंड, तर चार चाकी वाहन मालकांना दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करुन नवीन कायदा आणला आणि त्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली. नव्या कायद्यानुसार तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. लायसन्स नसताही वाहन चालविणाऱ्यांकडून 5 हजार रुपये दंड वसूल केला जाईल.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने त्याला विरोध केला. तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नवीन मोटर वाहन कायद्याल तुर्तास स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु राज्यात वाहतुक नियमांचे होणारे उल्लंघन आणि वाढते अपघात पाहता परिवहन विभाग नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही होता. त्यानुसार परिवहन विभागाने 1 डिसेंबर 2021 ला अधिसूचना जाहीर केली आहे.
गाडी चालवताना मोबाईल बोलले तर दुचाकीस्वारांना 1000 रुपये, चार चाकी वाहन चालकाला 2000 रुपये आणि अन्य वाहन चालकाला 4000 रुपये दंड होणार आहे. वाहनांवरील फॅन्सी नंबर प्लेट बसविणे या वाहतुक नियमांविरोधात यापूर्वी 200 रुपये असलेल्या दंडाच्या रकमेत वाढ करुन ती 1000 रुपये करण्यात आली आहे.